गेल्या वर्षभरापासून भारतात आणि त्याहून अधिक काळापासून जगभरात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आत्तापर्यंत अनेक देशांनी आपल्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा लसीकृत केला आहे. मात्र, अद्याप भारतात लहान मुलांना देण्यासाठी कोणत्याही लसीला मान्यता मिळालेली नाही. देशभरात अनेक संस्था लहान मुलांना देता येईल, अशी करोना लस तयार करण्यासाठी संशोधन करत आहेत. मात्र, अद्याप ही लस कधी येईल, याविषयी कोणतीही निश्चित माहिती मिळत नसताना आता पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

देशात सध्या दिल्या जाणाऱ्या करोना लसींमध्ये सर्वाधिक वाटा हा सिरम इन्स्टिट्युटकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या कोविशिल्ड लसीचा आहे. त्यामुळे सिरम कडूनच १८ वयोगटापेक्षाही खालच्या आणि थेट तीन वर्षे वयाच्या मुलांना देखील देता येईल अशा लसीची घोषणा करण्यात आली होती. या लसीवर व्यापक प्रमाणात संशोधन करण्यात येत होतं. अखेर त्याच्या चाचण्यांच्या निष्कर्षांवर भाष्य करताना अदर पूनावाला यांनी ही लस कधी येईल याविषयी मोठी घोषणा केली आहे.

CII च्या चर्चासत्रात केली घोषणा

अदर पूनावाला यांना सीआयआय अर्थात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संस्थेकडून चर्चासत्रात आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना अदर पूनावाला यांनी लहान मुलांसाठीच्या कोवावॅक्स या लसीच्या घेण्यात येत असलेल्या चाचण्या आणि त्याचे निष्कर्ष याविषयी माहिती दिली.

लस प्रमाणपत्रावर मोदींच्या छायाचित्राची लाज का वाटते?; केरळ उच्च न्यायालयाचा सवाल

“लहान मुलांसाठी असलेली आमची कोवावॅक्स ही व्हॅक्सिन सध्या चाचणी स्तरावर आहे. पण तिच्या चाचण्यांचे अतिशय उत्तम निष्कर्श दिसत आहेत. अगदी ३ वर्षे वयाच्या मुलांवर देखील या लसीची चाचणी करण्यात आली आहे. चाचण्यांमधून येणाऱ्या निष्कर्षांचा विचार करता लहान मुलांसाठीची आमची लस येत्या सहा महिन्यांत लाँच केली जाईल”, असं अदर पूनावाला म्हणाले.

लसीच्या मागणीपेक्षा पुरवठा अधिक

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या लसीकरणामध्ये मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याचं अदर पूनावाला यांनी यावेळी सांगितलं. “सध्या जगभरात करोना लसींचा पुरवठा हा जगभरातील देश हाताळू शकतील यापेक्षा जास्त आहे. या देशांमध्ये लसीकरणाचा वेग आणि प्रमाण जरी कमी असलं, तरी लसीकरण करण्यासाठीची व्यवस्था कमी असल्यामुळे त्यांच्याकडून लसींची मागणी घटली आहे”, असं अदर पूनावाला यांनी सांगितलं.