केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. शाह यांनी बुधवारी (६ डिसेंबर) लोकसभेत केलेल्या भाषणात भारत-पाकिस्तान युद्धाचा संदर्भ देत पंडित नेहरूंना लक्ष्य केलं. अमित शाह म्हणाले, नेहरूंनी केलेल्या चुकांमुळे काश्मीरला खूप काही भोगावं लागलंय. भारत-पाकिस्तान युद्धात आपलं सैन्य जिंकत होतं. परंतु, पंजाब जिंकल्यानंतर नेहरूंनी युद्धबंदीची घोषणा केली. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला. नेहरूंनी तीन दिवसांनंतर युद्धबंदी केली असती, तर आज पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असता. त्यानंतर नेहरूंनी आणखी एक चूक केली. त्यांनी भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला.
अधीर रंजन चौधरी म्हणाले, पाकव्याप्त काश्मीरबाबत संसदेत एक अख्खा दिवस चर्चा व्हायला हवी. कारण हा काही छोटा वाद नाही. देशातल्या जनतेला या वादाचं गांभीर्य आणि खोली माहिती असायला हवी. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह पाकव्याप्त काश्मीर हिसकावून घेण्याच्या घोषणा करत आहेत. अमित शाह जसं म्हणतायत त्याप्रमाणे आपण असं मानूया की, नेहरूंनी चूक केली होती. अमित शाह गेल्या दशकभरापासून तीच तक्रार करत आहेत. २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आलं तेव्हा लोकसभेत अमित शाह म्हणाले होते, पीओके, सियाचीन हा सर्व काश्मीरचा भाग आहे. तसेच अमित शाह हा भाग परत मिळवण्याचा दावा करत होते. यांच्या सरकारला आता १० वर्ष होत आली आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांचं सहा वर्षे सरकार होतं. या १६ वर्षांमध्ये पाकव्याप्त काश्मीर घेण्यापासून तुम्हाला कोणी अडवलं होतं? या देशात दोन पराक्रमी नेते आहेत. एक मोदी आणि दुसरे शाह, या दोघांना पाकव्याप्त काश्मीर घेण्यापासून कोणी रोखलंय?
हे ही वाचा >> “…तर संपूर्ण भारत भाजपाला मतदान करेल”, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचं लोकसभेत अमित शाहांना आव्हान
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, पाकव्याप्त काश्मीरचं राहूद्या, किमान तिथून एक सफरचंद तरी आणून दाखवा. पाकव्याप्त काश्मीरमधून चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर बनवला जातोय. यावर मोदी आणि शाह का गप्प बसले आहेत? तुम्ही जी-७, जी-२०, शांघाय परिषदांना जाता, मग तिथे जाऊन पीओकेसाठी प्रयत्न का करत नाही. पाकव्याप्त काश्मीर घेऊन दाखवा. काँग्रेसला जमलं नाही ते काम तुम्ही करून दाखवा, एखादं सफरचंद आणून दाखवा. तेवढं केलं तरी तो तुमचा मोठा पराक्रमक असेल. लडाखमध्ये अतिक्रमण झालंय. गलवान खोऱ्यातल्या घटना सर्वांना माहिती आहेत.