भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी त्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनीही त्यांच्या पक्षाच्या माजी नेत्याचे स्मरण केले. मात्र, त्यांना त्यांचे ट्विट डिलीट करावे लागले.

अधीर रंजन यांनी ट्विटरवरून राजीव गांधींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी एका ग्राफिकद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली, ज्यात ‘जब बडा पेड गिरता है तो धरती कांपती है’ असे लिहिले होते. राजीव गांधी यांनी त्यांच्या आईच्या म्हणजेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या शीखविरोधी असलेल्या दंगलींबद्दलही कथितपणे असे म्हटले होते. इंदिरा गांधींच्या शीख अंगरक्षकांनी १९८४ च्या ब्लू स्टार ऑपरेशनवर संतापाच्या भरात त्यांची हत्या केल्यानंतर देशातील सर्वात रक्तरंजित हत्याकांडात दिल्ली आणि पंजाबमध्ये ३,००० हून अधिक शीख मारले गेले होते.

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना अधीर रंजन म्हणाले की, माझा याच्याशी काहीही संबंध नाही. विरोधकांकडून माझ्या विरोधात प्रचार केला जात आहे. “माझ्या पूर्ण खात्रीने, मी ठामपणे सांगत आहे की माझ्या नावाने केलेले ट्विट हे दुसरे तिसरे काही नसून काही बेईमान घटकांकडून, माझ्या आणि माझ्या पक्षाचे शत्रू असलेल्या काही दुष्ट शक्तींद्वारे प्रचारित केलेली एक दुर्भावनापूर्ण मोहीम आहे. म्हणून, मी त्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करणार आहे,” असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या इतर अनेक नेत्यांनी शनिवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. आधुनिक भारताच्या निर्मितीत राजीव गांधींच्या योगदानाचेही त्यांनी स्मरण केले. सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा, संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि इतर अनेक काँग्रेस नेत्यांनी ‘वीर भूमी’वर पोहोचून राजीव गांधींना श्रद्धांजली वाहिली.

वडिलांचे स्मरण करून राहुल गांधी यांनी ट्विट केले. “माझे वडील एक दूरदर्शी नेते होते ज्यांच्या धोरणांमुळे आधुनिक भारताला आकार देण्यात मदत झाली. ते एक दयाळू मनुष्य होते. माझ्यासाठी आणि प्रियांकासाठी एक अद्भुत पिता, ज्यांनी आम्हाला क्षमा आणि सहानुभूतीचे मूल्य सांगितले. मला त्याची आठवण येते, आम्ही एकत्र घालवलेल्या वेळांची आठवण येते,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या वडिलांबद्दल राहुल गांधींचे ट्विट रिट्विट केले.

अनेक काँग्रेस नेत्यांनीही राजीव गांधींना श्रद्धांजली वाहिली. राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी झाला. १९८४ ते १९८९ या काळात त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले. २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांची हत्या झाली.

Story img Loader