पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी आता वर्षभराचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र, २०२४ व २०१९ च्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी ठरणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन करत आपली शक्ती भाजपाविरोधात एकवटली आहे. त्यामुळे ही निवडणूक एनडीए विरुद्ध इंडिया आणि इतर पक्ष अशी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत काही मोठ्या लढतींची अपेक्षा असून त्यात रायबरेलीचा नंबर पहिल्या पाच लढतींमध्ये लागू शकतो. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून भाजपा आदिती सिंह यांना उमेदवारी देणार असल्याची आहे. कोण आहेत या आदिती सिंह?

आदिती सिंह रायबरेलीत काँग्रेसला भिडणार?

काँग्रेससाठी हक्काच्या मानल्या जाणाऱ्या देशातील प्रमुख मतदारसंघांपैकी रायबरेली हा एक मतदारसंघ आहे. खुद्द सोनिया गांधी या मतदारसंघातून लोकसभेत निवडून जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर काँग्रेसचंच वर्चस्व राहिलं आहे. यंदा सोनिया गांधी निवडणूक न लढवता ही जागा प्रियांका गांधी किंवा राहुल गांधी यांना देण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. मात्र, काँग्रेसकडून कोणताही उमेदवार निश्चित झाला, तरी भाजपाकडून आदिती सिंह यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

आधी काँग्रेस, मग भाजपा, आता काँग्रेसविरोध!

३६ वर्षीय आदिती सिंह या उत्तर प्रदेशच्या विद्यमान विधानसभेतील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आहेत. २०१७मध्ये ३० वर्षीय आदिती सिंह यांनी काँग्रेसकडून रायबरेलीत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, २०२१मध्ये भाजपाशी लागेबांधे असल्याच्या आरोपांवरून काँग्रेसनं आदिती सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर काही महिन्यांतच आदिती सिंह यांनी अधिकृतरीत्या भाजपामध्ये प्रवेश केला. २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत आदिती सिंह भाजपाच्या तिकिटावर विधानसभेत निवडून आल्या.

इंडिया की एनडीए? मायावतींचं ठरलं; भूमिका स्पष्ट करताना म्हणाल्या, “२००७ प्रमाणेच…!”…

आदिती सिंह यांनी २०१७ मध्ये पंजाबमधील काँग्रेसचे आमदार अंगद सिंह सैनी यांच्याशी विवाह केला. आदिती सिंह यांचे वडील अखिलेशकुमार सिंह यांनी वेगवेगळ्या पंक्षांकडून रायबरेली विधानसभा मतदारसंघाचं पाच वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांच्याच जागेवर आदिती सिंह यांना २०१७ साली तिकीट देण्यात आलं होतं. मैसूरमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्या आदिती सिंह यांनी अमेरिकेच्या ड्यूक विद्यालयातून मॅनेजमेंटचं शिक्षणही घेतलं आहे.

काँग्रेससाठी पेपर अवघड?

दरम्यान, एकीकडे आदिती सिंह यांची उमेदवारी रायबरेलीतून निश्चित मानली जात असताना दुसरीकडे सोनिया गांधींच्याच मतदारसंघात काँग्रेससाठी पेपर अवघड ठरण्याची चिन्हं दिसत आहेत. सोनिया गांधींनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस प्रियंका गांधींना रायबरेली तर अमेठीतून राहुल गांधींना उमेदवारी देण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसच्या हाती असणारा उत्तर प्रदेशमधील एकमेव मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यामुळे प्रियांका गांधींना उमेदवारी मिळाल्यास त्यांना हा मतदारसंघ राखण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागण्याची शक्यता आहे.

Story img Loader