चांद्रयान-३ च्या यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक मोहीम हाती घेतली आहे. इस्रो आता सूर्यावर स्वारी करणार आहे. म्हणजेच इस्रो आपलं यान सूर्याच्या दिशेने पाठवणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इस्रो त्यांचं सन मिशन लाँच करू शकते. इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला ‘आदित्य एल-१’ असं नाव देण्यात आलं आहे. सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळं या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही मोहीम हाती घेतली आहे. इस्रोचं हे अवकाशयान पुढच्या महिन्यात इस्रोच्या बंगळुरू येथील मुख्यालयातून सूर्याच्या दिशेने पाठवलं जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रो ‘एल १’ च्या अभ्यासासाठी अवकाशयान पाठवणार आहे. ‘एल-१’ हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधील एक बिंदू आहे. तिथपर्यंत हे यान जाणार आहे. हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर आहे. म्हणजे आदित्य एल-१ यान तब्बल १५ लाख किलोमीटर दूर जाणार आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीचं हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने पाठवून सूर्याच्या भोवतालाची परिस्थिती आणि इतर संशोधन केलं जाईल. आवरणाचा, म्हणजेच कोरोनाचा (सूर्याच्या वातावरणातील सर्वात बाहेरच्या भागाला करोना म्हणतात) अभ्यास करण्यासाठी या यानामध्ये सात वेगवेगळी उपकरणे बसवण्यात आली आहेत. यासाठी अवकाशयानाबरोबर ७ वेगवेगळे पेलोड पाठवले जातील.

बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सने व्हिजिबल एमिशन लाईन कोरोनोग्राफ पेलोडच्या विकासात महत्त्वाचं काम केलं आहे. तर सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप हे या मोहिमेसाठी महत्त्वाचं साधन आहे. यासाठी पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्सने पुढाकार घेतला आहे.

यू. आर. राव उपग्रह केंद्रात तयार केलेला उपग्रह दोन आठवड्यांपूर्वी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या स्पेसपोर्टवर दाखल झाला आहे. २ सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे उपग्रह सूर्याच्या दिशेने पाठवला जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

सौरवादळं आणि त्याचा अवकाशातील हवामानावर होणारा परिणाम याचा अभ्यास या मोहिमेद्वारे केला जाईल. या अवकाशयानाबरोबर पाठवलेले चार पेलोड (चार उपकरणं) हे सूर्याच्या हालचालींचा अभ्यास करतील. कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, प्री फ्लेअर आणि फ्लेअर अ‍ॅक्टिव्हिटी, त्याची वैशिष्ट्ये, हवामानावरील त्याचे परिणाम या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची असणार आहे.

हे ही वाचा >> Chandrayan 3 : चांद्रमोहिमेच्या यशामागचे मराठमोळे हात, नांदेडच्या संशोधिकेचं ‘विक्रम’च्या लँडिंगमध्ये मोठं योगदान

आदित्य एल-१ मोहिमेद्वारे भारत पहिल्यांदाच सूर्याचा अभ्यास करणार आहे. परंतु, जगभरात असे काही देश आहेत, ज्यांनी कित्येक वर्ष आधी सौरमोहिमा पार पाडल्या आहेत. अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्र म्हणजेच नासाने १९६० मध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पहिली मोहीम राबवली होती. १९६९ पर्यंत अमेरिकेने सूर्याच्या दिशेने एकूण ६ अवकाशयानं पाठवली. यापैकी ५ मोहिमा यशस्वी झाल्या. १९७४ मध्ये जर्मनीची अंतराळ संशोधन संस्था आणि नासाने संयुक्त मोहीम हाती घेतली. नासा आणि युरोपने मिळून आतापर्यंत १५ सौरमोहिमा राबवल्या आहेत. यापैकी काही अवकाशयानांचं काम अजूनही सुरू आहे. २०२० मध्ये ‘ईएसए’ने (युरोपियन अंतराळ संशोधन संस्था) पहिल्यांदाच स्वतंत्रपणे कोणाच्याही मदतीशिवाय सौरमोहीम राबवली. सौरमोहिमा राबवणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत आता भारताचा समावेश होणार आहे. याबाबतीत भारत चीन आणि रशियाच्याही पुढे असणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya l1 how close to sun will isro spacecraft go solar mission research asc
Show comments