चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी ठरल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता सूर्यावर स्वारी करण्याच्या तयारीत आहे. इस्रो आपलं यान आदित्य एल-१ हे सूर्याच्या दिशेने पाठवणार आहे. या सौरमोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळं आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने आदित्य एल-१ ही सौरमोहीम हाती घेतली आहे.
या सौरमोहिमेसाठी इस्रोच्या यू. आर. राव उपग्रह केंद्रात तयार केलेला उपग्रह दोन आठवड्यांपूर्वी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या स्पेसपोर्टवर पोहोचवण्यात आला आहे. येथूनच आदित्य एल-१ हे यान अवकाशात झेपावणार आहे. २ सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह सूर्याच्या दिशेने पाठवला जाईल. सकाळी ११.५० वाजता हे अवकाश यान लाँच केलं जाईल.
दरम्यान, या सौरमोहिमेची तयारी पूर्ण झाली असल्याचं इस्रोने सांगितलं आहे. इस्रोने बुधवारी जाहीर केलं की, या लाँचिंगचा सराव (तालीम) पूर्ण झाला आहे. रॉकेटची चाचणी पूर्ण झाली असून इस्रोचं यान सूर्याच्या दिशेने झेपावण्यासाठी सज्ज आहे.
हे ही वाचा >> Aditya L1 Mission Launch Live Streaming : आदित्य एल-१ च्या लाँचिंगची तारीख-वेळ ठरली, थेट प्रक्षेपण पाहता येणार
नागरिकांना थेट प्रक्षेपण पाहता येणार
इस्रोने नागरिकांना आदित्य एल-१ चं प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केलं आहे. नागरिकांना याचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION/index.jsp या लिंकवर नोंदणी करावी लागेल. SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून हे प्रक्षेपण सर्वजण पाहू शकतात. ISRO ने यासंबंधी एक द्वीट करत नागरिकांना प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केलं आहे.