उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे आज (२३ नोव्हेंबर) बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंनी थेट बिहरला जाऊन या नेत्यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली असावी. भेटीचे नेमके कारण काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. दरम्यान, या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत, या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. ही भेट राजकीय नव्हती, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा >> बिहार दौऱ्याचा अजेंडा काय आहे? आदित्य ठाकरे म्हणाले, “मागील अनेक दिवसांपासून…”
“या भेटीपूर्वीही नितीश कुमार, तेजस्वी यादव यांच्याशी आमचं बोलणं व्हायचं. सध्या नितीश कुमार, तेजस्वी यादव बिहारमध्ये उत्तम काम करत आहेत. बिहारचा विकास होत आहे. याच कारणामुळे भेट व्हावी म्हणून मी आज येथे आलो होते. आज नितीश कुमार, तेजस्वी यादव यांच्याशी माझी भेट झाली,” अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
हेही वाचा >> बसवराज बोम्मई यांच्या विधानानंतर मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा सरकारला सल्ला, म्हणाले “जतमधील ४० गावांनी…”
“आमची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. पर्यावरण, विकास, उद्योगधंदे हे चर्चेचे विषय होते. जो तरूण देशासाठी, रोजगार, संविधानसाठी तसेच महागाईविरोधात काम करू इच्छित आहे, त्यांच्यात चर्चा होणे गरजेचे आहे. असे केले तरच देशासाठी काहीतरी सकारात्मक काम करता येईल. या भेटीत आम्ही राजकारण, निवडणूक या विषयावर चर्चा केलेली नाही. आज आमची भेट होणे गरजेचे होते. आमच्यात अगोदरपासूनच चांगले संबंध आहेत. आमच्यात कोणतीही कटुता नाही. ही मित्रता आगामी काळातही अशीच राहील, असा मला विश्वास आहे. या भेटीला राजकीय रंग देऊ नये,” असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >> बसवराज बोम्मईंच्या विधानामुळे नवा वाद, शिंदे-भाजपा सरकारवर टीकेची झोड; विरोधक आक्रमक
आदित्य ठाकरे यांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांना मुंबईत येण्याचे आमंत्रण दले आहे. याबाबत बोलताना “जेव्हा वेळ असेल तेव्हा मुंबईत या, असे आमंत्रण मी त्यांना दिले आहे. हे येणे-जाणे सुरुच राहणार आहे. त्यांनी मला येथील पर्यटणस्थळं पाहण्यासाठी बोलावले आहे. तर मीदेखील त्यांना मुंबईत येण्याचे आमंत्रण दिले आहे. प्रत्येकवेळी राजकारण करणे गरजेचे नाही. तेजस्वी यादव चांगले काम करत आहेत. महाराष्ट्रात देशातील प्रत्येकजण सौहार्दाने राहतो. मागील अडीच वर्षात आम्ही संविधानानुसार राज्यकारभार हाकत होतो. विकासावर आम्ही काम करत होतो,” असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.