पीटीआय, नवी दिल्ली : ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वतीने प्रसिद्ध झालेल्या ‘जागतिक युवा नेत्यांच्या यादीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांच्यासह देशभरातील सहा तरुण नेत्यांचा समावेश आहे. अन्य भारतीयांमध्ये ‘टीव्हीएस मोटर’चे व्यावस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, ‘जिओ हाप्तिक टेक्नॉलॉजी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आक्रित वैश, ‘बायोझीन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विबिन बी. जोसेफ आणि ‘पॉलिसी ४.० रिसर्च फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तन्वी रत्न यांचा समावेश आहे.
४० वर्षांखालील जगातील सर्वात आश्वासक युवा नेतृत्वाची यादी दरवर्षी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वतीने प्रसिद्ध केली जाते. ‘‘विविध क्षेत्रातील युवा आणि उदयोन्मुख तरुणांची एकूणच कार्यक्षमता आणि त्यांचे कौशल्य, समाजासाठी त्यांनी केलेले कार्य आदी गुणांच्या आधारे ही यादी तयार केली जाते,’’ असे या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. यंदाच्या यादीत राजकीय नेते, उद्योजक, खेळाडू, संशोधक यांच्यासह १०० जणांचा समावेश करण्यात आला आहे.