कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जण कॉलेजमध्ये हिजाब घालण्याच्या अधिकाराचे समर्थन करत आहेत, तर काही आपला निषेध नोंदवत आहेत. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही याप्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली आहे. शाळांमध्ये गणवेश आवश्यक आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
“शाळा/महाविद्यालयांमध्ये विहित गणवेश असेल तर त्याचे पालन केलेच पाहिजे. शैक्षणिक संस्थामध्ये केवळ शिक्षणावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. शाळा/महाविद्यालयांमध्ये धार्मिक किंवा राजकीय विषय आणू नयेत. चांगलं आणि दर्जेदार शिक्षण मिळायला हवं,” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील उडुपी कॉलेजमध्ये हिजाब परिधान केल्याच्या घटनेने सुरू झालेल्या वादाचे देशभरात पडसाद उमटत आहेत.
कर्नाटकातील उडुपी येथील एका महाविद्यालयात सहा मुलींना महाविद्यालयीन गणवेश परिधान न करता हिजाब परिधान केल्यामुळे त्यांना वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. यानंतर मुलींनी आंदोलन केले होते. कॉलेजला न जुमानता त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. या प्रकरणावर काल उच्च न्यायालयात सुनावणी झाली. व्यक्तीच्या वैयक्तिक विश्वासापेक्षा संविधान आणि कायदा महत्त्वाचा आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.
त्यानंतर हा वाद कर्नाटकातील अनेक कॉलेजांमध्ये पेटला आहे. उडुपीच्या कॉलेजमध्येही याच संदर्भात घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी राज्यातील शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली.
कर्नाटकमध्ये सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादात भाजपा आमदार रेणुकाचार्य यांनी नवा वाद निर्माण केला आहे. महिलांच्या कपड्यांमुळे बलात्कार वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी बिकिनी घालण्याच्या अधिकाराबाबत ट्विट केल्यानंतर भाजपा आमदाराने हे वक्तव्य केले आहे.
बिकिनी असो, बुरखा असो, जीन्स असो की हिजाब असो, तिने काय घालायचे हे ठरवण्याचा अधिकार महिलांचा आहे. हा अधिकार भारतीय संविधानाने संरक्षित केला आहे. महिलांचा छळ करणे थांबवा, असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.