राज्य सरकारमधील पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पोहोचले होते. यावेळी बोलताना बहुतेक राज्ये पर्यटन आणि पर्यावरणावर लक्ष केंद्रित करत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच हा विभाग एक साइड पोर्टफोलिओ मानला जातो, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नासह आणखी बऱ्याच विषयांवर वक्तव्य केले.
‘एबीपी न्यूज’च्या ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट’ कार्यक्रमात आदित्य ठाकरे पोहोचले होते. जिथे त्यांना अँकरने विचारले होते की, ‘योगी आदित्यनाथ हे आजच्या राजकारणात हिंदुत्वाचे सर्वात मोठे प्रतीक आहेत?’, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “या प्रश्नावर प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात, परंतु प्रत्येक राज्याच्या स्वतःच्या वेगळ्या गरजा आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “उत्तर प्रदेशमध्ये त्यांना जनतेने निवडून दिले आहे आणि आम्ही आमच्या पक्षाचा प्रचारही केला होता पण आम्हाला यश आले नाही. ज्वलंत हिंदू नेते योगी आदित्यनाथ यांच्याशी लढण्यासाठी दुसरा कोणी नेता आहे का?, असा सवाल आदित्य ठाकरेंना विचारला असता त्यांनी भाजपावर निशाणा साधत ही सर्व प्रचाराची चर्चा असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येकाला माहितीये की वस्तुस्थिती काय आहे आणि पक्ष काय करतात, असं ते म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या राज्याची जशी गरज असते तिथे त्यानुसार नेते निवडून येतात. जर एखाद्या राज्यात एखादा हिंदू नेता दुसऱ्या एखाद्या पक्षातून निवडून आला असेल तर तो हिंदू नाही का? किंवा एखाद्या राज्याचा नेता हिंदू नसेल तर तो त्याचा दोष आहे का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच लोकशाहीबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणतात की, आमच्या राज्यात आतापर्यंत वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांची सत्ता राहिली आहे.