नूह :हरियाणाच्या नूह जिल्ह्याच्या नाल्हर भागातील शिवमंदिरात पूजा करण्यास १५ साधू आणि हिंदूत्ववादी संघटनांच्या नेत्यांना प्रशासनाने सोमवारी परवानगी दिली. सर्वजातीय हिंदू महापंचायतीने केलेले शोभायात्रा काढण्याचे आवाहन पाहता या मंदिराचे किल्ल्यात रूपांतर झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३१ जुलै रोजी झालेल्या धार्मिक संघर्षांमुळे अधिकाऱ्यांनी सोमवारच्या यात्रेला परवानगी नाकारली आहे. तथापि, श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवारी स्थानिक रहिवाशांना त्यांच्या घराजवळच्या मंदिरांमध्ये पूजेची परवानगी देण्यात आली आहे.

यात्रेचे आवाहन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली असून, नूहच्या दिशेने निघालेल्या काही साधूंना गुरुग्राम येथेच थांबवण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> डिसेंबरमध्येच निवडणुका? भाजपाच्या हेलीकॉप्टर्स बुकिंगचा दाखला देत ममता बॅनर्जींचा दावा

दिल्ली- गुरुग्राम सीमेवर नूहपर्यंत पाच मोठे तपासणी नाके उभारण्यात आले असून, माध्यमांच्या वाहनांना तिसऱ्या नाक्यापलीकडे जाण्याची मुभा देण्यात आलेली नाही.

अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, अयोध्येतील जगद्गुरू परमहंस आचार्य यांना सोहनानजिकच्या घामडौज टोल नाक्यावर रोखण्यात आले. मी माझ्या अनुयायांसह नल्हार मंदिरात जलाभिषेकासाठी शरयू नदीचे जल आणि अयोध्येतील माती घेऊन आलो होतो, पण पोलिसांनी मला अडवले, असे आचार्यानी पत्रकारांना सांगितले. याच्या निषेधार्थ त्यांनी टोल नाक्याजवळच बेमुदत उपोषण सुरू केले.

सुमारे १५ साधू आणि काही हिंदूत्ववादी संघटनांचे नेते यांना नल्हारमधील शिवमंदिरात जाण्याची व तेथे जलाभिषेकाची परवानगी देण्यात आली असल्याचे नूहचे उपायुक्त धीरेंद्र खडगाता यांनी सांगितले. स्वामी धरम देव व स्वामी परमानंद यांचा परवानगी मिळालेल्यांमध्ये समावेश आहे. नल्हारच्या मंदिरात पूजा केल्यानंतर, काही स्थानिकांसह हा गट फिरोझपूर झिरका येथील झिर मंदिराकडे रवाना झाला.

हेही वाचा >>> “चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा” म्हणणाऱ्या स्वामींची प्रकाश राज यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, “चांद्रयानाच्या लँडिंगनंतर…”

दरम्यान, सोहना ते नूह या भागात शुकशुकाट होता. एकही दुकान उघडे नव्हते आणि रस्त्यांवर नागरिकही दिसत नव्हते.

बाहेरच्या लोकांना नूहमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. जिल्ह्याच्या सर्व प्रवेश मार्गावर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हरियाणा पोलिसांचे १९०० कर्मचारी व निमलष्करी दलांच्या २४ तुकडय़ा, दंगलविरोधी वाहने आणि ड्रोनही तैनात करण्यात आले आहेत.

पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

नूह :  हरियाणातील एका पोलीस उपनिरीक्षकाचा सोमवारी येथे हृदयविकाराने मृत्यू झाला.  सर्व जातीय हिंदू महापंचायतीच्या ‘शोभायात्रेच्या’ आवाहनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बडकाली चौक येथे तैनात करण्यात आलेल्या हकमुद्दीन (४७) याला दुपारी साडेबाराच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. त्याला रुग्णालयात हलवण्यात आले असता तो मरण पावला, असे पोलीस निरीक्षक रतन लाल यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administration permission in noah for worship in shiva temple zws