पाकिस्तानी गायक अदनान सामी याच्या व्हिसाला परराष्ट्र खात्याने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलीसांनी अदनान सामीला व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहात असल्याबद्दल नोटीस बजावली होती. सात दिवसांमध्ये नोटिसीला उत्तर देण्याची अट घालण्यात आली होती. आपण व्हिसाला मुदतवाढ मिळण्यासाठी अर्ज केला असून, तो अद्याप परराष्ट्र खात्याकडे प्रलंबित असल्याचे सामी याने पोलीसांना सांगितले. अखेर तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यामुळे अदनान सामीचे भारतातील वास्तव्य वैध ठरणार आहे. सहा ऑक्टोबर रोजीच अदनानच्या व्हिसाची मुदत संपली होती. त्यामुळे त्याने तातडीने देश सोडून जावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केली होती.