मला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सहानुभूती वाटते आहे कारण दिल्लीतल्या अदृश्य शक्ती महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहेत असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींचं नाव न घेता भाजपावर आणि मोदींवर टीका केली आहे.
काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे?
“मला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कायमच सहानुभूती वाटते. कारण दिल्लीतली अदृश्य शक्ती महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम करते आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी असोत सगळ्यांना कमकुवत कसं करता येईल हे पाहिलं जातं आहे. मी हवेत हा आरोप करत नाही याचे माझ्याकडे पुरावे आहेत मी हे म्हणणं सिद्ध करु शकते. दिल्लीत बसलेल्या या ‘अदृश्य शक्ती’मुळे मराठी माणूस, महाराष्ट्रातला हिरे व्यापार, महाराष्ट्रातल्या नोकरीच्या संधी, एवढंच काय क्रिकेट सामनेही त्यांना कमकुवत करायचे आहेत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- खासदार सुप्रिया सुळेंनी जेजुरीत घेतला ‘पॅरामोटरिंग’चा आनंद, १२०० फुटांवरुन पाहिला जयाद्री पर्वत आणि कडेपठार
दिल्लीतल्या अदृश्य शक्ती असं म्हणत सुप्रिया सुळेंनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र कमकुवत करायचा हेच त्यांचं उद्दीष्ट आहे असं त्या म्हणाल्या आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. आता सुप्रिया सुळेंनी जे वक्तव्य केलं आहे त्यावर भाजपाचे नेते काही बोलणार का?