अडवाणी, जोशींसह ज्येष्ठांचे थेट शरसंधान; आणखी सात खासदारांचेही नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
बिहार विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भारतीय जनता पक्षात दुहीचे फटाके तडतडू लागले आहेत. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, शांता कुमार आणि यशवंत सिन्हा यांनी तर गेल्या वर्षभरात पक्ष मूठभर लोकांच्या हातात गेल्यानेच ही पाळी ओढवल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातच बंडाचे निशाण रोवले आहे. तर बिहारमधील आणखी सात खासदारांनीही निवडणुकीतील पराभवावरून पक्षनेतृत्वावर उघड प्रश्नचिन्ह लावले आहे. यामुळे मोदी आणि शहा यांच्या पक्षांतर्गत निर्विवाद नेतृत्वाला प्रथमच आव्हान देण्यात आले आहे.

दिल्लीच्या पराभवापासून पक्षाने धडा घेतला नाही, अशा शब्दात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मोदी व शहा यांना सुनावले आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहा यांना अध्यक्षपदी विराजमान करून मोदी यांनी ज्येष्ठ नेते अडवाणी, जोशी यांची मार्गदर्शक मंडळात रवानगी केली होती. त्यांच्यासह शांताकुमार व यशवंत सिन्हा यांनी संयुक्त निवेदनात शहा-मोदी जोडीवर अप्रत्यक्षपणे टीका करीत बिहारमधील पराभवाची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असा आग्रह धरला आहे.

मंगळवारी रात्री उशीरा अडवाणी यांच्या निवासस्थानी ‘मार्गदर्शक’ मंडळाची पहिली (अनधिकृत) बैठक पार पडली. या बैठकीत जोशींसह माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ पत्रकार अरूण शौरी, यशवंत सिन्हा, शांता कुमार उपस्थित होते.
बिहारमधील पराभवाला प्रत्येकजण जबाबदार आहे, हे म्हणणे म्हणजे कुणीच जबाबदार नसल्याचे भासवणे आहे. पक्ष विजयी झाला असता तर ज्यांनी विजयाचे श्रेय मिरवले असते ते आता या दारुण पराभवाची जबाबदारी झिडकारत आहेत, असेही त्यातून दिसते, असा टोला या ज्येष्ठांनी हाणला आहे.

बिहारमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते सी. पी. ठाकूर यांनीही नेतृत्वावर आणि सरसंघचालकांवर थेट निशाणा साधला आहे. पक्षात मी बरीच वर्षे काम केले, पण केंद्रीय नेतृत्व आणि कार्यकर्ते यांचे नाते मालक आणि नोकर या पद्धतीचे आज जसे दिसते तसे कधीच पाहिले नव्हते, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. बिहारमध्ये भाजपची सुरुवात चांगली होती, मात्र भागवत यांच्या एका विधानाने आम्ही निवडणूक हातची घालवली. लालू आणि नितीश यांनी त्या विधानाचा ज्या जोमाने वापर केला त्यानंतर तर पक्ष कोलमडलाच, असेही ठाकूर यांनी नमूद केले.

खासदार आक्रमक

बिहारमधील पराभवावरून मोदी आणि शहा यांच्यावर आणखी सात खासदारांनी मंगळवारी टीका केल्याचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’चे प्रतिनिधी लिझ मॅथ्यु यांनी दिले आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून स्थानिक खासदारांना दूर ठेवले, पैशाच्या जोरावर उमेदवाऱ्या दिल्या गेल्या, असा गंभीर आरोपही दोन खासदारांनी केला आहे. बेगुसरायचे खासदार आणि ज्येष्ठ नेते भोला सिंग यांनी शहा व मोदींना थेट जबाबदार धरले आहे. मोदी यांनी प्रचारात लालूप्रसाद यांच्या पातळीवर उतरून चूक केली, असे त्यांनी सुनावले आहे.
आरक्षण वक्तव्यानंतर बाजू सावरण्याच्या नादात पक्षाने मंडलवादी धोरण स्वीकारले. हे म्हणजे कावळ्याने मोरपिसे लावून नाचण्याचा प्रकार होता. यामुळे पारंपरिक मतदारही पक्षापासून दुरावला, असे कडवे बोलही भोला सिंग यांनी ऐकवले आहेत. शेओहर येथील खासदार रमा देवी, गया येथील खासदार हरी मांझी, मुजफ्फरपूरचे खासदार अजय निषाद, उजियारपूरचे खासदार नित्यानंद राय, झंझारपूरचे खासदार चौधरी बिरेंद्र कुमार यांनीही जातीय समीकरणे ताडण्यात आलेले अपयश, स्थानिक पातळीवर तुटलेला संपर्क आणि बेताल वक्तव्ये यावर कोरडे ओढले आहेत.

शहांची पाठराखण

धास्तावलेल्या अमित शहा यांनी केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह, शहरी विकास मंत्री वैंकय्या नायडू व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. अडवाणी, जोशी, सिन्हा यांच्या आक्षेपांवर स्पष्टीकरण देत राजनाथ सिंह, नायडू व गडकरी यांनी संयुक्त पत्रक प्रसिद्ध केले. ‘यापूर्वी शहा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला चार राज्यांमध्ये विजय मिळाला आहे. परंतु आम्ही ज्येष्ठांनी केलेल्या सूचनांचा आदरपूर्वक विचार करतो’, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान, शहा-मोदींविरोधात वक्तव्य देणाऱ्यांना एकप्रकारे ज्येष्ठ नेत्यांनी वाचविले आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्यास ज्येष्ठांवरही कारवाई होणार करणार का, या संभाव्य प्रश्नामुळे मोदी-शहा गटात खळबळ माजली आहे.

२० नोव्हेंबरला शपथविधी?
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचा २० नोव्हेंबरला शपथविधी होण्याची शक्यता आहे. दिवाळी आणि छठपूजेत जनता व्यग्र असल्याने १८ नोव्हेंबरनंतरच हा शपथविधी होईल, असे संयुक्त जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष बशिष्ठ नारायण सिंग यांनी सांगितले. काँग्रेसनेही सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे सांगतानाच दर पाच आमदारांमागे एक मंत्री, असे सूत्र मंत्रिमंडळ निवडीसाठी ठरल्याचे वृत्तही सिंग यांनी फेटाळले.

प्रचारकाचे बौद्धिक
घमेंडीच्या भरात आपल्या चुकाही कबूल न करण्याची चूक ही अधिक हानीकारक असते, असे मत जाहीरपणे मांडत गुजरातमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे बौद्धिक घेतले आहे. चुकांकडून माणसानं शिकलं पाहिजे आणि त्यासाठी आधी चुकीची कबुली देऊन त्या दुरुस्त केल्या पाहिजेत, असेही जैन यांनी नमूद केले.

वेगवान ‘मंगल’वार..
* मंगळवारी रात्री उशिरा अडवाणी यांच्या निवासस्थानी ज्येष्ठांची बैठक.
* अरुण शौरी आणि गोविंदाचार्य यांचीही जोशी यांच्याशी सविस्तर चर्चा.
* अमित शहा यांची राजनाथ सिंह, वैंकय्या नायडू व नितीन गडकरी यांच्याशी चर्चा. नंतर या तिघांकडून संयुक्त पत्रकात सारवासारव.

Story img Loader