जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाय़ा राज्यघटनेतील कलम ३७० ला भारतीय जनता पक्षाने कायमच विरोध केला असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना अडवाणी यांनी पक्षाची भूमिका आपल्या ब्लॉगवर मांडली.
फसवणूक केली… दिशाभूल केली, हे शब्दप्रयोग भाजपविरोधात वापरू नये, असा सल्ला देत अडवाणी यांनी पक्षाने घटनेतील ३७० कलमाला कायमच विरोध केला, असे सांगितले. जवाहरलाल नेहरू आणि अन्य काही नेते वगळले, तर कॉंग्रेसनेसुद्धा जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा द्यायला विरोध केला होता. सरदार पटेल यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये ३७० कलामाला विरोध केला होता. केवळ पंडित नेहरूंचा मान राखण्यासाठी त्यांनी आपला विरोध लावून धरला नाही, असे अडवाणी यांनी ब्लॉगवर म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेशी असमहत असण्याचा ओमर अब्दुल्ला यांना संपूर्ण अधिकार आहे. मात्र, आपला विरोध दर्शविताना त्यांनी फसवणूक करणारे, दिशाभूल कऱणारे यासारखे शब्दप्रयोग वापरू नये, असे अडवाणी यांनी म्हटले आहे.

Story img Loader