भारतीय जनता पक्षाचे ‘पितामह’ लालकृष्ण अडवाणी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना हुकूमशहा हिणवणाऱ्या भाजप-जनसंघाचे संस्थापक नेते असलेल्या अडवाणी यांनी देशावर पुन्हा आणीबाणी लादली जाण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे म्हटले आहे. अडवाणी यांच्या या विधानामुळे काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
देशात यापूर्वी १९७५-७७ या काळात आणीबाणी लादण्यात आली होती. यापुढे नागरी स्वातंत्र्यावर गदा आणली जाणार नाही अथवा ते हिरावून नेले जाणार नाहीत याची हमी देता येण्यासारखे कोणतेही काम करण्यात आलेले नाही आणि तसे झाल्यास नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर पुन्हा एकदा गदा येईल, असेही अडवाणी म्हणाले.
देशात आणीबाणी लादली गेली त्याला ४० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये अडवाणी यांनी सडेतोड मते मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भारताचा विचार केल्यास सध्या विश्वास ठेवता यावा अशा नेतृत्वाचा अभाव असल्याचेही अडवाणी यांनी म्हटले आहे. लोकशाहीशी बांधीलकी आणि लोकशाहीशी संबंधित अन्य घटक यांचा अभाव आहे.  मात्र देशातील सध्याचे नेतृत्व परिपक्व नाही, असा त्याचा अर्थ नाही, परंतु काही उणिवा असल्याने आपल्याला विश्वास वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.अडवाणी यांच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणीबाणीची सुरुवात दिल्लीपासून सुरू झाल्याची टीका केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तर आम्ही केंद्राकडून दररोज आणीबाणी अनुभवतो, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
देशात कायदा व राज्यघटना सुरक्षित असली तरी लोकशाहीला चिरडण्याची क्षमता असलेल्या शक्ती प्रबळ झाल्या आहेत. अर्थात आणीबाणी लादणे सोपे नाही, परंतु असे होणारच नाही याची शाश्वती नाही.  अडवाणी यांच्या वक्तव्यानंतर समाजवादी पक्ष, काँग्रेस व आम आदमी पक्षाने मोदींवरच टीका केली. काँग्रेसला तर जणू काही आयतीच संधी मिळाली आहे. काँग्रेस नेते टॉम वडक्कन म्हणाले की, अडवाणींनी मोदींविषयीची भावनाच बोलून दाखवली आहे.

अडवाणी यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. त्यांचा रोख संस्थांकडे होता. त्यांच्या मतांचा मी आदर करतो. मात्र आणीबाणी येईल अशी परिस्थिती देशात दिसत नाही.
-एम.जे. अकबर, भाजप प्रवक्ते

Story img Loader