भाजप राष्ट्रीय परिषदेच्या अधिवेशनात रविवारी सकाळी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचे इच्छुक गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा अप्रत्यक्षपणे उधळलेला अश्वमेध सायंकाळ होता होता भाजपचे सर्वोच्च नेते ८६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांनी तितक्याच अप्रत्यक्षपणे शब्दांची लगाम वापरून रोखण्याचा प्रयत्न केला. मोदींना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पíरकर यांच्या स्पर्धेत उतरावे लागेल, याचे त्यांनी इशाऱ्याइशाऱ्यात संकेत दिले.
गुजरात विधानसभेतील विजयांच्या हॅट्ट्रिकसह मोदींनी पंतप्रधानपदाच्या संभाव्य उमेदवाराच्या आवेशात भाषण करण्यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह सर्वच ज्येष्ठ नेते त्यांची आरती ओवाळत होते. उभे राहून अभिवादन करीत होते. ३३ वर्षांपूर्वी भाजपचा पाया रचणारे अडवाणी हे नाटय़ दिवसभर बसून शांतपणे न्याहाळत होते. पण मार्गदर्शनाच्या भूमिकेत अधिवेशनाचा समारोप करताना अडवाणींमधील खडुस नेता जागा झाला आणि त्यांनी मोदींनी निर्माण केलेल्या उन्मादातील हळूच हवा काढण्याचा प्रयत्न केला. मोदींना शह देण्यासाठी अडवाणींनी सुषमा स्वराज यांना पुढे केले.आज सुषमांचे एवढे उत्कृष्ट भाषण ऐकल्यानंतर आता पुन्हा समापनाचे भाषण कशासाठी, असा प्रश्न आपल्याला पडल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर सुषमांची तारीफ करताना अडवाणींनी त्यांची तुलना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींशी केली. ज्याप्रकारचा न्यूनगंड अटलजींच्या भाषणांनी आपल्यात निर्माण व्हायचा, तसाच तो सुषमांच्या भाषणाने होतो आहे, असेही प्रांजळपणे त्यांनी सांगून टाकले. अडवाणींच्या भाषणात विनोदाचा अभाव असतो. पण ‘सुषमांनंतर रवीशंकर बोलले, चांगले बोलतात. पण कुणी ऐकायलाच तयार नव्हते. त्यांची अडचण मला दिसत होती,’ असे म्हणत त्यांनी भाजपच्या अन्य नेत्यांच्या वक्तृत्वाच्या मर्यादाही स्पष्ट केल्या. मोदींपुढे केवळ सुषमांचेच नव्हे तर शिवराजसिंह चौहान यांचेही आव्हान त्यांनी उभे केले.
शिवराजसिंह चौहान यांनी प्रत्येक नेत्याचे नाव घेऊन स्तुती केली, असे ते म्हणाले. त्यांनी र्पीकर यांच्या गोव्यातील सुशासनाचेही कौतुक केले आणि भाजपपाशी प्रतिभावान, अनुशासित, योग्य, समर्पित, देशभक्त, समाजसेवेसाठी तत्पर अशा नेत्यांची मांदियाळी असल्याचे सांगून मोदीही अशा नेत्यांपैकी एक असल्याचे भासविले.
स्वामी विवेकानंद ‘नरेंद्र’ यांचे राष्ट्रभक्तीचे विचार मांडून त्यांनी वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या साडेपाच वर्षांच्या कारकीर्दीची अडवाणींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. वाजपेयींसारखा यशस्वी पंतप्रधान दुसरा कोणी नाही झाला, असा दावा अडवाणींनी केला.
गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या भ्रष्ट सरकारपासून देशाची सुटका करण्याची व्यवस्था या राष्ट्रीय परिषदेत झाल्याचे नमूद करताना आगामी लोकसभा निवडणुकीत ज्या अपेक्षा राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, नरेंद्र मोदी, शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केल्या त्या पूर्ण होतील, असा विश्वास या अधिवेशनातून निर्माण झाल्याची भावना अडवाणींनी बोलून दाखविली. राजकारणात बुजुर्ग नेते सहजासहजी हार मानत नाही, हेच अडवाणींनी समारोपाच्या भाषणाने दाखवून दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा