भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी पुन्हा एकदा आजारी पडले आहेत. आजारी असल्यामुळेच त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटण्यास बुधवारी नकार दिला. भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करून पदांचा राजीनामा दिलेल्या अडवाणी यांनी भागवत यांच्या सल्ल्यामुळे राजीनामा मागे घेतला होता. अडवाणींच्या राजीनामानाट्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते राजधानी दिल्लीत भेटणार होते. मात्र, अडवाणी आजारी असल्यामुळे ही भेट होऊ शकणार नाही.
दरम्यान, पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केशवकुंज भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात भागवत यांची भेटी घेतली. या दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली ते मात्र समजलेले नाही. पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह आणि इतर ज्येष्ठ नेते सुद्धा बुधवारी संध्याकाळी भागवत यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
भाजपच्या गोव्यामध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. या निवडीनंतरच अडवाणी यांनी पक्षातील पदांचे राजीनामे दिले होते. मोदी यांच्या निवडीवर अडवाणी नाराज असल्यामुळेच त्यांनी राजीनामे दिले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा