विरोधकांच्या गोंधळाला न जुमानता कामकाज रेटून नेण्याच्या सत्ताधारी भाजपच्या रणनीतीवरून पक्षाचे मार्गदर्शक मंडळाचे सदस्य व ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडेच नाराजी व्यक्त केली आहे. गोंधळात कामकाज तहकूब करण्याऐवजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन कामकाज सुरूच ठेवतात. पावसाळी अधिवेशनात एकदाही विरोधकांना समजावण्यात अपयशी ठरल्याने सरकारने कामकाज रेटण्याची रणनीती आखली. मात्र गोंधळ सुरू असताना कामकाज सुरू ठेवणे कदापि योग्य नाही; त्याऐवजी कामकाज तहकूब करा, अशा शब्दात अडवाणी यांनी राजनाथ सिंह यांना त्यांच्या संसदेतील दालनात सुनावले. हा सर्व प्रकार सुरू असतानादेखील लोकसभेचे कामकाज सुरूच होते. सभागृहात असताना अडवाणी यांनी राजनाथ सिंह व वैंकय्या नायडू यांना यासंबंधी विचारणा केली. मात्र सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अडवाणी थेट सभागृहातून निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ राजनाथ सिंहदेखील बाहेर पडले.
भाजपकडून अडवाणी हे सभागृहात नियमित उपस्थित राहणारे सदस्य आहेत. वर्षांनुवर्षांची ही परंपरा अडवाणी आजही निभावतात. त्यामुळे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ खासदाराने नाराजी व्यक्त केल्याने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. आज लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास प्रचंड गोंधळात सुरू होता. काँग्रेसचे सदस्य ललित मोदी प्रकरणावरून विदेश मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी करीत होते. हातातील फलक लोकसभा टीव्हीच्या स्क्रिनला व्यापतील अशा बेताने धरून काँग्रेसची निदर्शने सुरू होती. अशाही परिस्थितीत महाजन यांनी कामकाज सुरूच ठेवले.
त्यामुळे अडवाणी सभागृहाबाहेर गेले ते थेट राजनाथ सिंह यांच्या दालनासमोर. राजनाथ सिंह यांच्याकडे तीव्र शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. जे सुरू आहे ते योग्य नाही; अशी कानउघाडणी करून अडवाणी संसदेबाहेर जात असताना समोर माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ दिसले. त्यांना सवयीप्रमाणे हात जोडून नमस्कार करीत अडवाणी यांनी मनातील भाव व्यक्त केला. संसदीय संकेतानुसार गोंधळ सुरू असताना कामकाज पुढे रेटणे शिष्टाचार समजला जात नाही. मात्र विरोधकांच्या आडमुठेपणामुळे कामकाज सुरू ठेवावे, ही रणनीती अडवाणी यांना मान्य नव्हती, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा