Japan Earthquake Update : जपानमध्ये सोमवारी आलेल्या महाभयंकर भूकंपाचे फोटो बचाव अधिकाऱ्यांनी मंगळवारी शेअर केले. या फोटोंमध्ये जपानमध्ये झालेला विंध्वस स्पष्ट दिसत आहे. जपानच्या काही भागात ७.६ रिश्टर स्केलचा भूंकप आला होता. या भूकंपामुळे त्सुनामाचाही इशारा देण्यात आला होता. परंतु, सध्या तरी त्सुनामीचा धोका टळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जपानच्या होन्शु या मुख्य मध्य बेटावरील उत्तर इशिकावा प्रांतात सोमवारी शक्तिशाली भूकंप झाला. त्सुनामीच्या लाटा पश्चिम किनार्‍यावर आदळल्याने किनारपट्टीवरील हजारो लोकांनी स्थलांतर करण्यात आले. मंगळवारी भूकंपातील मृतांची संख्या ४८ वर पोहोचली. पंतप्रधान फुमियो किशिदा म्हणाले की, सर्वात जास्त नुकसान झालेल्या नोटो प्रायद्वीपच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचण्यासाठी बचावकर्त्यांना वेळ लागला. अनेकजण बचावाच्या प्रतीक्षेत आहेत, तर भूकंपात १६ जण जखमी झाले आहेत.

इमारती आणि पायाभूत सुविधांचं नुकसान

वाजिमा शहरातील भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली होती. याठिकाणी धुराचे लोट पसरले असल्याचं फोटोंमधून स्पष्ट दिसतंय. तर, या आगीत इमारती आणि वाहने जळून खाक झाली आहेत. “भूकंपामुळे प्रभावित झालेल्यांचा शोध आणि बचाव ही काळाविरुद्धची लढाई आहे”, असं पंतप्रधान किशिदा यांनी आपत्कालीन बैठकीदरम्यान सांगितले. बचावकर्त्यांना नोटो प्रायद्वीपच्या उत्तरेकडील टोकापर्यंत प्रवेश करणे फार कठीण जात होते. येथे हेलिकॉप्टर सर्वेक्षण केल्यानंतर इमारती आणि पायाभूत सुविधांचं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे. नोटोच्या उत्तरेकडील भागात जाण्यासाठी पर्वतीय खिंडीतून जाणार्‍या रस्त्यांनाही तडे गेले आहेत.

भूकंपाची परिस्थिती आपत्तीजनक

सुझू शहरात किमान २० मृतांची नोंद झाली असून भूकंपानंतर किमान ६० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भूकंपाच्या केंद्राजवळील ५ हजाराहून अधिक घरे असलेल्या किनारपट्टीच्या परिसरात १ हजार घरे उद्ध्वस्त झाली असण्याचा अंदाज आहे. ही परिस्थिती आपत्तीजनक आहे, असं महापौर मासुहिरो इझुमिया म्हणाले.

भूकंपामुळे इमारती कोसळल्या (फोटो- एएफपी)

वाहतूक सेवा विस्कळीत

सोमवारी भूकंपाचा पहिला धक्का बसल्यापासून सुमारे २०० धक्के जाणवले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी जोरदार धक्के बसण्याचा इशारा जपानच्या हवामान संस्थेने दिला आहे. मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांनी मंगळवारी जपानमधील लोकांना पुढील आठवड्यात सात रिश्टर स्केलच्या तीव्र भूकंपासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. भूकंपामुळे उत्तर आणि वायव्य जपानच्या प्रमुख भागांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे. नोटो विमानतळावरील कार पार्कमध्ये सुमारे ५०० लोक अडकले होते. कारण धावपट्टी आणि टर्मिनल इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उड्डाण सेवा थांबवण्यात आली होती.

वीज आणि पाणीपुरवठा खंडित

सरकारने सोमवारी रात्री सुमारे एक लाख लोकांना त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश दिले. त्सुनामीचा इशारा मागे घेतल्यानंतर जवळपास निम्मे लोक मंगळवारी त्यांच्या घरी परतले. होकुरिकू इलेक्ट्रिक पॉवरच्या वेबसाइटनुसार तापमान कमी झाल्यानंतर मंगळवारी इशिकावा प्रीफेक्चरमध्ये सुमारे ३३ हजार कुटुंबे वीजविना राहिली. तर, जवळपास २० हजार घरांमध्ये पाणीपुरवठा नव्हता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aerial photographs show scale of devastation after japan earthquake sgk
Show comments