अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस आणि त्यांची मॅकेन्झी यांचा घटस्फोट हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरणार आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल एक्वायर’ या वृत्तपत्राने या घटस्फोटामागील कारण स्पष्ट केले आहे. वृत्तपत्रानुसार जेफ यांचे त्यांच्या मित्राच्या पत्नीशी अफेर सुरु होते त्यामुळेच मॅकेन्झीने जेफला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. हा घटस्फोट झाल्यास जेफ यांना मॅकेन्झीला संपत्तीमधील अर्धा वाटा म्हणजेच ६९ अब्ज डॉलर किंमतीची संपत्ती द्यावी लागणार आहे. एकंदरितच जेफ यांना मित्राच्या पत्नीशी अफेअर केल्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे असचं सध्या दिसत आहे.

५४ वर्षीय जेस बेझॉस हे सध्या लॉरेन सांचेझच्या (४९) प्रेमात पडले आहेत. लॉरेन ही एका नृत्याच्या कार्यक्रमाची सुत्रसंचालक म्हणून काम करते. त्याआधी ती एका वृत्तवाहिनीची न्यूज अँकर होती. हॉलिवूडमध्ये टॅलेण्ट एजंट म्हणून काम करणारा सांचेझचा पती पॅट्रीक व्हाईटसेल आणि बेझॉस दोघे चांगले मित्र आहेत. बेझॉस यांनी लॉरेन सांचेझला पाठवलेले काही प्रेमाचे मेसेजही आपल्याकडे असल्याचा दावा ‘नॅशनल एक्वायर’ने केला आहे. बेझॉसने सांचेला पाठवलेल्या मेसेज पैकी एक मेसेज “I want to smell you, I want to breathe you in. I want to hold you tight… I want to kiss your lips… I love You. I am in love with you.” असा असल्याचे बोलले जात आहे. सांचेझने नुकताच पॅट्रीकला घटस्फोट दिला असून ती नवऱ्यापासून विभक्त राहते.

ब्लूबर्गच्या माहितीनुसार जेफ बेझॉस यांच्याकडे एकूण १३७ अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. त्यात ८० अब्ज शेअर्सचा वाटा आहे. वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राची मालकी सुद्धा बेझॉस यांच्याकडे आहे. या जोडप्याकडे ४ लाख एकरची मालमत्ता आहे. घटस्फोटामुळे बेझॉस यांच्या एकूण संपत्तीमध्ये खूप मोठी घट होऊ शकते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सध्या बेझॉस यांच्याकडे पाहिले जात असले तरी घटस्फोटानंतर ही परिस्थिती पूर्णपणे बदलेली असेल. घटस्फोटानंतर बेझॉस आणि मॅकेन्झी यांच्यामध्ये संपत्तीचे समान वाटप झाले तर ६९ अब्ज डॉलर इतकी संपत्ती मॅकेन्झी यांच्या नावावर होईल. यामुळे बेझॉस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमधील आपले पहिले स्थान गमावतील. तर दुसरीकडे ६९ अब्ज डॉलर संपत्तीमुळे मॅकेन्झी जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरतील. घटस्फोटानंतर संपत्तीची अर्धी अर्धी विभागणी झाल्यास मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरतील. त्यांच्याकडे सध्या ९२.५ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

Story img Loader