उत्तर प्रदेशमधील देवबंदमधील दारुल उलूम या इस्लामिक मदरशाने आपल्या कॅम्पसमध्ये महिलांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. महिला येऊन सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी आज सांगितले. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहिल्यानंतर देशभरातून मुस्लिम समाजाकडून तक्रारी आल्या. त्यामुळे मोहतमीम (प्रशासक) मौलाना मुफ्ती अबुल कासिम नोमानी यांनी सर्व महिलांसाठी बंदी घालण्याची घोषणा केली. “दारुल उलूम ही इस्लामिक सेमिनरी आहे आणि अशा प्रकारची कृत्ये कोणत्याही शाळेत मान्य नाहीत”, असं ते म्हणाले.
“इतकेच नाही तर दारुल उलूममध्ये शिक्षणाचे नवे सत्र सुरू झाले आहे. गर्दीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. आम्हाला या संदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत”, असंही ते म्हणाले.
महिलांनी केला होता विरोध
दारुल उलूमच्या परिसरात महिलांना प्रवेश बंदी करण्यात आल्याने महिलांनी याला प्रचंड विरोध केला. मशिदीच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की, या निर्णयानंतर काही महिलांनी विरोधही केला. मात्र सर्व स्पष्टीकरणानंतर त्यांनीही समर्थन केले. हा संपूर्ण निर्णय विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि रीलबाबत घेण्यात आला आहे. दारुलच्या या निर्णयानंतर आता महिलांना येथील बांधकाम सुरू असलेल्या ग्रंथालयात आणि आशियातील प्रसिद्ध मशिदीमध्ये जाता येणार नाही.
हेही वाचा >> दाढी केलेल्या चार विद्यार्थ्यांची दारुल उलूम देवबंदने केली हकालपट्टी, इतर विद्यार्थ्यांना दाढी वाढवण्याचे आदेश
गेल्यावर्षी दाढी केलेल्या विद्यार्थ्याची केली होती हकालपट्टी
दारुल उलूम देवबंदने दाढी केलेल्या चार विद्यार्थ्यांची गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हकालपट्टी केली होती. उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर या ठिकाणी असलेली इस्लामी शिक्षण संस्था दारुल उलूम देवबंदने एक आदेश जारी करत विद्यार्थ्यांनी दाढी काढू नये असं सांगण्यात आलं होतं. दारुल उलूम देवबंद या संस्थेतील शिक्षण विभागाचे प्रभारी मौलाना हुसैन अहमद यांनी एक आदेश जारी केला. या आदेशात हे स्पष्ट करण्यात आलं आहे की जो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आला आहे त्याने दाढी काढू नये. जो विद्यार्थी दाढी काढेल त्याची हकालपट्टी करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं होतं.
मुस्लिम महिलांनी केस कापू नये, भुवया कोरु नये
काही वर्षांपूर्वी या शिक्षणसंस्थेने महिलांसाठी फतवा काढला होता. मुस्लिम महिलांनी केस कापू नये, तसेच त्यांच्या भुवयाही कोरु (आय-ब्रो) नयेत असा एक फतवा ‘दारुल उलूम देवबंद’ने २०१७ मध्ये जारी केला होता. मौलाना सादिक काजमी यांनी हा फतवा जारी करत या गोष्टी इस्लाममध्ये निषिद्ध असल्याचे म्हटले. दारुल उलूमने याआधीच हा फतवा जारी करायला हवा होता असेही काजमी यांनी म्हटले. सहारणपूर येथील एका मुस्लिम माणसाने त्याच्या पत्नीचे केस कापण्याबाबत सादिक काजमी यांच्याकडे सल्ला मागितला होता. ‘मुस्लिम धर्मात महिलांनी केस कापणे आणि भुवया कोरणे योग्य आहे का?’ असे त्याने विचारले होते. त्यानंतर काही दिवसातच हा फतवा जारी करण्यात आला आहे.