अफगाणिस्तानमधील स्थितीवर संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. त्यातच भारत काय भूमिका घेतं? याकडे नजरा लागून होत्या. युएनएससीच्या बैठकीत भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती यांनी भारताचं म्हणणं मांडलं. “दहशतवादी गटांकडून अफगाणिस्तानचा वापर इतर कोणत्याही देशाला धमकी देण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी केला जात नाही. तोपर्यंत शेजारी देश सुरक्षित असतील. आम्ही काबुलच्या हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चित्र पाहिलं आहे. त्यातून लोकांमध्ये दहशत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. महिला, लहान मुलं संकटात आहेत. विमानतळासह शहरातून गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातील सध्याची स्थिती चिंताजनक आहे.”, असं टीएस तिरूमूर्ती यांनी बैठकीत सांगितलं.

एनडीटीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात निमलष्करी दलांसह २०० हून अधिक भारतीय सध्या काबूलमध्ये अडकले आहेत. एक भारतीय विमान सध्या काबूल विमानतळावर उभे आहे. मात्र, तालिबान्यांनी शहरात कर्फ्यू लावला असल्याने भारतीय नागरिकांना विमानतळावर कसे आणावे ही मुख्य चिंता आहे.

सत्तांतराचं काय?

तालिबान्यांनी सत्ता हस्तगत केल्यानंतर आता नेमकं सत्तांतर कसं होणार आहे? एखाद्या देशात लष्कर किंवा बंडखोर सत्ता हस्तगत करतात, तेव्हा तिथे काय घडतं किंवा अफगाणिस्तानमध्ये आता काय घडणार आहे याची चर्चा सुरू आहे. तसेच, अफगाणिस्तानच्या पदच्युत झालेल्या सरकारमधील गृहमंत्र्यांनी हिंसाचार न होता सत्तांतर होईल, असं स्पष्ट केल्यामुळे तर ही चर्चा अधिकच वाढली आहे.

अफगाणिस्तानच्या अध्यक्षांनी देश सोडला!

दरम्यान, अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अशरफ घनी यांनी याआधीच देशातून पळ काढला आहे. देशवासीयांना त्रास होऊ नये, म्हणून आपण देश सोडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सत्तांतराची प्रक्रिया अधिकच क्लिष्ट आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी अधिक काळ दहशतीच्या छायेखाली ठेवणारी झाली आहे.

समजून घ्या : तालिबानी नक्की आहेत तरी कोण? आणि त्यांच्यापासून जगाला एवढा धोका का वाटतोय?

अध्यक्षांनी देश सोडला, देशात काय घडतंय?

राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर आता अफगाणिस्तानमधील पदच्युत सरकारमधील काही नेत्यांनी एक कौन्सिल स्थापन केली आहे. तालिबानी आणि अफगाणिस्तान यांच्यात समन्वय करून ही कौन्सिल सत्तांतराची कार्यवाही करेल. माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. यानुसार, हाय कौन्सिल फॉर नॅशनल रिकौन्सिलिएशनचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला, हिज्ब ए इस्लामीचे नेते गुलबुदीन हेकमाटयार आणि हमीद करझई स्वत: या कौन्सिलचे सभासद असतील. अफगाण नागरिकांचा मनस्ताप कमी करून शांततापूर्ण वातावरणात सत्तांतर व्हावं यासाठी ही व्यवस्था केल्याचं हमीद करझई यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.