अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळवला आणि हाहाकार उडाला. हजारो अफगाण तालिबानच्या आधीच्या अनुभवांवरून देश सोडण्याच्या तयारीत होते. अफगाणिस्तान सोडून इतर कोणत्याही देशात विस्थापितांचं जगणंही ते जगायला तयार होते. यात केवळ प्रौढच नाहीत, तर अगदी लहानमोठे सर्वच होते. हे सर्वच अफगाणची राजधानी काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी काही फोटोंनी जगाचं लक्ष वेधलं. हे फोटो अमेरिकन सैनिक लहान मुलांना गर्दीतून वाचवण्यासाठी तारेच्या कुंपणावरून विमानतळावर घेण्यासाठी मदत करत असल्याचे होते. मात्र, आता अशाच काही लहान मुलांपैकी एक बाळ बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

मिर्झा अली अहमदी आणि त्यांची पत्नी सुरया १९ ऑगस्ट २०२१ रोजी आपल्या ५ मुलांसह काबुल विमानतळाच्या बाहेर आले होते. मात्र, प्रत्येकजण तालिबानच्या भितीने अफगाण सोडण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत असल्यानं विमानतळाबाहेर प्रचंड गर्दी झाली. लोक विमानतळाच्या सुरक्षा भिंतीवरील तारेचं कुंपण पार करून विमानतळात प्रवेशाचा प्रयत्न करत होते. मात्र, गर्दी इतकी वाढली की चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी मिर्झा अली अहमदी यांनी आपल्या २ महिन्यांच्या बाळाचा प्राण वाचवण्यासाठी कुंपणाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या सैनिकांकडे बाळ सोपवलं.

२ महिन्याचं बाळ कुठं याचा शोध लागेना

बाळाला अमेरिकन सैनिकांकडे सोपवल्यानंतर मिर्झा अली अहमदी आणि त्यांची पत्नी सुरया आपल्या इतर ४ मुलांसह कसेबसे विमानतळात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी अमेरिकन सैनिकाकडे दिलेलं आपलं २ महिन्याचं बाळ शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा भिंतीवरून हे बाळ एका सैनिकाकडून दुसऱ्या सैनिकाकडे देत विमानतळावर खाली उतरवण्यात आलं. या बाळाशिवाय इतरही लहान मुलांना अशाच पद्धतीने सुरक्षित विमानतळावर घेण्यात आलं. मात्र, मिर्झा आणि सुरया यांचं २ महिन्याचं बाळा त्यांना बराच वेळी प्रयत्न करूनही सापडलंच नाही.

आई-वडिलांसह सैनिकांनीही ३ दिवस शोध घेतला, मात्र बाळ मिळेना

मिर्झा आणि सुरया यांनी ज्या सैनिकाकडे बाळ दिलं त्याचाही शोध घेतला. मात्र, त्या सैनिकानेही ते बाळ इतरांकडे सोपवल्यानं बाळाचा शोध घेणं कठीण झालं. या सैनिकाने कमांडरशी संपर्क करून बाळाची चौकशी केली. तेव्हा बाळांना गर्दी आणि गोंधळातून सुरक्षित ठेवण्यासाठी विमानतळाच्या खास विभागात ठेवलं असू शकतं अशी शंका व्यक्त करण्यात आली. मात्र, त्या ठिकाणी शोधल्यानंतर तेथेही हे २ महिन्यांचं बाळ सापडलं नाही. अशाप्रकारे ३ दिवस शोध घेऊनही बाळ सापडलं नाही.

हेही वाचा : तालिबानला धक्का; अफगाणिस्तानात सत्तास्थापनेनंतर झाली वरीष्ठ नेत्याची हत्या, आयसिसने घेतली जबाबदारी!

सध्या हे कुटुंब अमेरिकेतील टेक्सासच्या फोर्ट ब्लिस या अफगाण विस्थापितांच्या छावणीत राहतंय. ते कतार, जर्मनी असा प्रवास करत अमेरिकेत पोहचले. इथं त्याचं कुणीही ओळखीचं नाही. ते आपल्या २ महिन्यांच्या बाळाला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी विस्थापितांसोबत काम करणारी एक संस्था देखील प्रयत्न करत आहे. मात्र, इतके दिवस होऊनही बाळ सापडलं नसल्यानं पीडित कुटुंब काळजीत आहेत.

Story img Loader