अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेलाय. रविवारी तालिबान बंडखोरांनी अफगाणिस्तानच्या राजधानीमध्ये प्रवेश करत येथील सरकारी इमारती अध्यक्षीय प्रासाद ताब्यात घेतला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सत्ता हस्तांतराबाबत चर्चा करण्यासाठी तालिबानचे मध्यस्थ रविवारी अध्यक्षीय राजवाड्यात पोहोचले. सरकारच्या बाजूने माजी अध्यक्ष हमीद करझई आणि अफगाण राष्ट्रीय सलोखा परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला वाटाघाटी करणार आहेत. बंद दरवाजाआडच्या या वाटाघाटी ‘तणावपूर्ण’ स्थितीत होण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. असं असतानाच दुसरीकडे अशरफ घनी यांनी आपण देश का सोडला यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. दुसरीकडे अफगाणच्या संरक्षण मंत्र्यांनी आता अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट येण्यामागे राष्ट्राध्यक्ष जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केलाय.
नक्की पाहा >> Video: काबूल विमानतळावर हजारो नागरिकांची गर्दी, देश सोडण्यासाठी धडपड; रात्रभर ऐकू येत होते गोळीबाराचे आवाज
अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री जनरल बिस्मिल्ला मोहम्मदी यांनी ट्विटरवरुन थेट नाव न घेता राष्ट्राध्यक्ष अशरफ घानी आणि त्यांच्या धोरणांवर मोजक्या शब्दात टीका केलीय. “त्यांनी आमचे हात पाठीमागे बांधून ठेवले आणि मातृभूमी विकली. त्या श्रीमंत व्यक्तीचा (राष्ट्राध्यश्र घनी) आणि त्याच्या गटाचा धिक्कार असो,” असं ट्विट मोहम्मदी यांनी केलं आहे.
دست ما را از پشت بستند و وطن را فروختند لعنت به غنی و دار دسته اش.
— General Bismillah Mohammadi (@Muham_madi1) August 15, 2021
अगदी सायंकाळपर्यंत मोहम्मदी यांना काबूल लढेल असा विश्वास असल्याचं त्यांच्या या पूर्वीच्या ट्विटमधून पहायला मिळालं. काबूलमधील सन्माननिय आणि धार्मिक व्यक्तींना मी अफगाण संरक्षण आणि सुरक्षा दलांच्या वतीने सांगू इच्छीतो की काबूलच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतलीय. काबूलच्या संरक्षणासाठी तुमचे सुरक्षा दल आणि संरक्षण फौजा कटीबद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय तुकड्या आपल्या संरक्षण आणि सुरक्षा दलांना मदत करण्यासाठी तयार आहेत, असं ट्विटही काबूलवर तालिबान्यांनी कब्जा मिळवण्याच्या आधी रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारस मोहम्मदी यांनी केलं. मात्र सायंकाळी राष्ट्राध्यक्ष घनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत देश सोडून पळून गेल्याचं जाहीर करण्यात आल्यानंतर काबूलवर तालिबानने ताबा मिळवल्याचं जवळजवळ निश्चित झालं. पुढील काही तासांमध्ये शहरामधील जवळजवळ सर्वच कार्यालये आणि अध्यक्षीय प्रासादावर तालिबानने ताबा मिळवला.
नक्की पाहा >> Video : तालिबानने ISIS आणि ‘अल-कायदा’च्या ५ हजार दहशतवाद्यांना तुरुंगातून दिलं सोडून
مردم شریف و متدین کابل من به نماینده گی از نیرو های دفاعی و امنیتی افغانستان به همهی شما اطمینان میدهم که امنیت کابل تأمین است نیرو های دفاعی و امنیتی شما بر تعهد خود مبنی بر دفاع از کابل متعهد هستند نیرو های بین الملی آماده هر نوع همکاری به نیرو های دفاعی وامنیتی تان است.
— General Bismillah Mohammadi (@Muham_madi1) August 15, 2021
“..म्हणून मी देश सोडला”
दरम्यान, अफगाणिस्तानातून पळून गेलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडण्याचे कारण स्पष्ट केले आहे. फेसबुकवर रात्री उशिरा त्यांनी याबाबत माहिती दिली. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असे घनी यांनी म्हटले आहे. “जर मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे,” असे घनी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
घनी कुठे गेले?
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी रविवारी देशातून पलायन केल्याची माहिती दोन अफगाणी अधिकाऱ्यांनी दिली. यापैकी एकजण माजी अध्यक्ष हमीद करझई यांच्या कार्यालयातील असून, दुसरा अफगाणी सुरक्षा परिषदेवर आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब आणि एक जवळचा सहकारी यांच्यासह घनी यांनी देशत्याग केला, परंतु ते कुठे गेले, हे तात्काळ कळू शकले नाही. मात्र ते ताझाकिस्तान मार्गे गेले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.