अध्यक्ष घनी परागंदा : बंडखोर काबूलमध्ये; नागरिक भयभीत

काबूल : अमेरिका आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून परतण्याची मुदत जवळ येऊ  लागताच सक्रिय झालेल्या तालिबानी बंडखोरांनी अवघ्या आठवडाभरातच जवळजवळ संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, तालिबान लवकरच काबूल येथील अध्यक्षीय प्रासादातून अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर करणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

अफगाण सरकारने विनाशर्त शरण येऊ न सत्तेचे ‘शांततापूर्ण हस्तांतर’ करावे असे आवाहन तालिबानी बंडखोरांनी केले आहे. ‘‘काबूल शहराचे शांततेत हस्तांतर व्हावे याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत’’, असे तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने कतारमधील अल-जझीरा वृत्तवाहिनीला सांगितले. मात्र आपली सैन्यदले आणि सरकार यांच्यातील संभाव्य वाटाघाटींचे तपशील सांगण्यास त्याने नकार दिला. तालिबानला कशा प्रकारचा करार हवा आहे असे विचारले असता, सरकारने विनाशर्त शरणागती पत्करावी, अशी आपली अपेक्षा असल्याचे तो म्हणाला.

तालिबानी बंडखोरांनी रविवारी काबूलमध्ये प्रवेश केला. मात्र ते शहराच्या मध्यभागाबाहेरच थांबले. दरम्यान, काही काळ काबूलच्या सीमेवर घालवल्यानंतर रविवार रात्री आपण या शहराच्या अंतर्भागात प्रवेश करू, असे तालिबानने सांगितले

होते. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने आता अफगाणिस्तान प्रशासनाच्या हाती फारसे काही उरलेले नाही.  महिलांचे अधिकार हिरावून तालिबान पूर्वीप्रमाणे अमानुष राजवट सुरू करील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. तालिबानने नागरिकांना संरक्षणाची हमी देऊनही पूर्वानुभवामुळे भयभीत नागरिक आणि परदेशी दूतावासांतील कर्मचाऱ्यांनी देशाबाहेर पडण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर अफगाणी सुरक्षा दलांनी पाश्चिमात्य देशांच्या लष्करांसाठी मोकळा केला आहे, असे एका वैमानिकाने सांगितले.

अमेरिकी आणि नाटो फौजांनी सुमारे दोन दशके अफगाणी सुरक्षा दलांची बांधणी करण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च केले. तरीही तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर एका आठवडय़ातच ताबा मिळवला. अफगाणी सुरक्षा दलांना अमेरिकी लष्कराची हवाई मदत असतानाही तालिबानने त्यांचा पराभव केला, काही सरकारी सैन्याला आपल्याबरोबर घेतले आणि काहींना पळवून लावले.

आपले लढवय्ये सैनिक लोकांच्या घरात शिरणार नाहीत किंवा त्यांच्या उद्योगांमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत, असे सांगून तालिबानने काबूलच्या रहिवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले. अफगाण सरकार किंवा परदेशी सुरक्षा दलांबरोबर काम करणाऱ्यांना आपण ‘माफी’ देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘कुणाचाही जीव, मालमत्ता किंवा प्रतिष्ठा यांना धक्का लावण्यात येणार नाही आणि काबूलच्या नागरिकांच्या जिवाला धोका पोहोचणार नाही,’ असे तालिबानने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आणि कुणीही राजधानीभोवतीच्या परिसरात फिरकू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

बंडखोरांनी रविवारी काबूलनजीकच्या जलालाबाद शहरावर कब्जा मिळवल्यानंतर काही तासांत अमेरिकी दूतावासाजवळ बोइंग सीएच-४७ चिनुक हेलिकॉप्टर्सची वर्दळ सुरू झाली.

संवेदनशील कागदपत्रे जाळली 

तालिबानी बंडखोरांनी काबूल शहराच्या सीमांवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्या भागांमध्ये अधूनमधून गोळीबाराचे आवाज येत होते, परंतु शहराला जोडणारे बहुतांश रस्ते शांत होते. कर्मचारी सरकारी कार्यालये सोडून निघून गेले आहेत. राजदूतावासांमधील कर्मचाऱ्यांनी मात्र संवेदनशील कागदपत्रे जाळून टाकल्याने धुराचे लोट शहरावर दिसत होते.

घनी कुठे गेले?

’अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी रविवारी देशातून पलायन केल्याची माहिती दोन अफगाणी अधिकाऱ्यांनी दिली.

’यापैकी एकजण माजी अध्यक्ष हमीद करझई यांच्या कार्यालयातील असून, दुसरा अफगाणी सुरक्षा परिषदेवर आहे.

’राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब आणि एक जवळचा सहकारी यांच्यासह घनी यांनी देशत्याग केला, परंतु ते कुठे गेले, हे तात्काळ कळू शकले नाही.

सत्ता हस्तांतराच्या वाटाघाटी

सत्ता हस्तांतराबाबत चर्चा करण्यासाठी तालिबानचे मध्यस्थ रविवारी अध्यक्षीय राजवाडय़ात पोहोचले. सरकारच्या बाजूने माजी अध्यक्ष हमीद करझई आणि अफगाण राष्ट्रीय सलोखा परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला वाटाघाटी करणार आहेत. बंद दरवाजाआडच्या या वाटाघाटी ‘तणावपूर्ण’ स्थितीत होण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

Story img Loader