तालिबानने सत्तेत आल्यानंतर इस्लामनुसार महिलांच्या हक्कांचं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं. मात्र, दिवसेंदिवस तालिबानच्या महिलांविरोधी दृष्टीकोन दाखवणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. मग ते महिलांना कार्यालयात प्रवेश नाकारणं असो की वर्गात शिक्षण घेताना मुलं आणि मुली यांच्यात लावलेले पडदे असो. तालिबानच्या क्रूरतेची आणखी एक घटना समोर आली असून या घटनेचा जगभरातून निषेध केला जात आहे. महिलांच्या आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना तालिबानने बेदम मारहाण केली आहे. या पत्रकारांच्या शरीरांवरील मारहाणीचे व्रण आणि जखमा दाखवणारे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये दोन पुरूष फक्त अंतर्वस्त्रांवर पाठमोरे उभे आहेत. त्यांच्या पायांवर आणि पाठींवर काठ्यांनी मारल्यानंतर लाल रंगांच्या जखमा आणि व्रण दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दर्याबी आणि नकदी हे दोघं बुधवारी पश्चिम काबुलच्या कर्त-ए-चार भागात महिलांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचे वार्तांकन करत होते. तिथून तालिबान्यांनी त्यांचे अपहरण केले, त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेले आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. “आम्ही पत्रकार आहोत असे आम्ही त्यांना ओरडून सांगत होतो. पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. एका क्षणी तर वाटलं की ते आम्हाला मारून टाकतील. त्यांनी आमचा खूप छळ केला,” असे नकदी यांनी लॉस एंजेलिस टाइम्सला सांगितले.
लॉस एंजेलिस टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानने त्यांच्या पत्रकारांना महिलांच्या आंदोलनाचे फोटो काढण्यापासून रोखलं. तसेच विदेशी पत्रकारांना आंदोलनस्थळ सोडण्यास भाग पाडलं. फ्रान्समध्ये मुख्यालय असलेल्या पॅन-युरोपियन टीव्ही न्यूज नेटवर्क युरोन्यूजच्या स्थानिक प्रमुखांसह इतर तीन पत्रकारांचेही अपहरण करण्यात आले. मात्र, त्या सर्वांना कोणतीही इजा न पोहोचवता सोडण्यात आलं. तसेच आंदोलनाचं वार्तांकन केल्यानं टोलो न्यूजचे कॅमेरापर्सन वाहिद अहमदी आणि एरियाना न्यूजचे रिपोर्टर समी जहेश यांच्यासह कॅमेरामन समीमसह इतर अनेक पत्रकारांनाही अटक करण्यात आली, असल्याचं वृत्त लॉस एंजेलिस टाइम्सने दिलंय.