अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये आश्रय घेतला आहे. आपण अफगाणिस्तानमध्ये परतण्यासंदर्भात चर्चा करत असल्यचाचं घनी यांनी म्हटलं आहे.तालिबानने रविवारी सायंकाळी देशाची राजधानी काबूलमध्ये कब्जा मिळवल्यानंतर घनी यांनी देश सोडल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र आता आपण पुन्हा मायदेशी परतण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे घनी म्हणाले आहेत.
याचप्रमाणे देशात सध्या सुरु असणाऱ्या वाटाघाटीच्या राजकीय चर्चांना आपला पाठिंबा असल्याचंही घनी यांनी म्हटलं आहे. “सध्या देशामध्ये सरकारने सुरु केलेल्या वाटाघाटीच्या चर्चांना माझा पाठिंबा आहे. आता अब्दुल्ला अब्दुल्ला आणि माझी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा यशस्वी होणं गरजेचं आहे,” असं घनी म्हणालेत.
काबूल हे राजधानीचे शहर तालिबानने काबीज केल्यानंतर आपण रक्तपात टाळण्यासाठी रविवारीच देश सोडला असं त्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. शहरातील साठ लाख लोकांसाठी ही मोठी मानवी शोकांतिका आहे, कारण त्यांना आता त्यांचे भवितव्य माहिती नाही, असंही घनी यांनी म्हटलं होतं.
नक्की वाचा >> चार गाड्या पैसा नाही तर या तीन गोष्टींसहीत देश सोडला; घनी यांनी दिलं स्पष्टीकरण
घनी यांनी अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना देश सोडण्याचं कारण सांगितलं होतं. “सशस्त्र तालिबानला राजप्रासादात घुसून हिंसाचार करू द्यायचा, की प्रिय देश सोडून जायचे असे दोन पर्याय होते. जर मी तेथेच राहिलो असतो तर तालिबानने हिंसाचार करीत आणखी लोकांना ठार केले असते. काबूल शहराचा विध्वंस झाला असता व साठ लाख लोकांना त्यामुळे आणखी धोका निर्माण झाला असता. तालिबानने मला देश सोडण्यास भाग पाडले. ते काबूलवर हल्लय़ासाठी आले होते, तेथील लोकांवर त्यांना हल्ले करायचे होते त्यातून मोठा रक्तपात झाला असता, त्यामुळे आपण देश सोडून जाणे पसंत केले. तालिबान्यांनी तलवारी व बंदुकांच्या जोरावर देश ताब्यात घेतला. आता देशातील लोकांचा सन्मान, संपत्ती व आत्मप्रतिष्ठा यांचे रक्षण करण्याचे काम त्यांचेच आहे,” असं घनी म्हणाले होते.
नक्की वाचा >> “भूतकाळात केलेली ती चूक मी पुन्हा घडू देणार नाही, अफगाणिस्तान लष्करच…”; बायडेन यांचा निर्धार
ते आरोप फेटाळून लावले…
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी पैशांच्या अनेक बॅगा घेऊन देशातून पळ काढल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असं घनी यांनी म्हटलं आहे. तसेच हे आरोप राजकीय हेतूने आणि छवी बिघडवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप घनी यांनी केल्याचं अल झजीराने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
नक्की वाचा >> “तालिबान अफगाणिस्तानमधील भारतीयांना लक्ष्य करणार नाही कारण त्यांना माहितीय, मोदीजी…”
कोण आहेत अशरफ घनी?
घनी हे अर्थशास्त्रज्ञ असून ते अफगाणिस्तानचे १४ वे अध्यक्ष होते. ते २० सप्टेंबर २०१४ रोजी पहिल्यांदा निवडून आले व नंतर २८ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची फेरनिवड झाली. गेल्या वर्षी मार्चमध्ये गुंतागुंतीच्या निवडणूक प्रक्रियेत त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते. आधी ते काबूल विद्यापीठाचे कुलपती होते, नंतर काही काळ देशाचे अर्थमंत्रीही होते.