काबूलवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर या सर्व प्रकरणात भारताची भूमिका काय आहे याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. भारताची भूमिका या सर्व प्रकरणामध्ये फार महत्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा म्हणजेच सीआयएचे प्रमुख विलियम बर्न्स यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची मंगळवारी दिल्लीमध्ये भेट घेतली. अधिकृत सुत्रांनी न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार डोवाल यांनी सीआयएचे प्रमुख बर्न्स यांची भेट घेतली असून या भेटीत बर्न्स यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य परतल्याने भारताकडून सहकार्याची अपेक्षा केलीय. भारताने क्षेत्रीय सुरक्षेसाठी गुप्त माहिती अमेरिकेसोबत शेअर करत एक मोठी जबाबदारी पार पाडावी असी अपेक्षा बर्न्स यांनी व्यक्त केलीय. भारताने वॉशिंग्टनसोबत जास्तीत जास्त माहिती शेअर करावी तसेच काही अफगाणी नागरिकांनाही आपल्या देशात आश्रय द्यावा अशी अमेरिकेची इच्छा आहे.
नक्की वाचा >> तालिबान-चीन संबंधांवर जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चीन आणि तालिबानचे संंबंध…”
सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसारमाध्यमांकडून दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी आम्ही पूर्णपणे फेटाळू शकत नाही तसेच त्या बातम्यांना दुजोराही देऊ शकत नाही. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा अधिकारी या आठवड्यामध्ये दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. सीआयए प्रमुखांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन प्रतिनिधिमंडळ पाकिस्तानच्या दौऱ्यावरही जाणार आहे. प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार अमेरिकन अधिकाऱ्यांनी मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत अफगाणिस्तान या विषयावर चर्चा केली. अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य बाहेर पडल्यानंतरची परिस्थिती, तेथील घटनाक्रम आणि त्यानंतर काबूलमधून लोकांची सुटका करण्यासारख्या विषयांवर चर्चा झाली. तालिबानने स्थापन केलेलं सरकार हा सुद्धा विषय या बैठकीत चर्चेमध्ये होता अशी माहिती समोर येत आहे.
नक्की वाचा >> दहशतवादी ते राष्ट्रप्रमुख… तालिबानने अफगाणची सत्ता ज्याच्या हाती दिली तो हसन अखुंद आहे तरी कोण?
आज म्हणजेच बुधवारी रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख निकोलाइ पत्ररूशेव पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. तसेच निकोलाइ हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणाऱ्या अजित डोवाल यांचीही भेट गेणार आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सुद्धा या बैठकीमध्ये असतील. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार बर्न्स यांच्या दौऱ्याबद्दल विचारण्यात आलं असता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि अमेरिकन दूतावासाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकन आणि रशिय अधिकाऱ्यांबरोबरच साऊथ ब्लॉकमध्ये अशा वेळी बैठका सुरु आहेत जेव्हा तालिबानने मोहम्मद हसन अखुंदच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमध्ये तात्पुरत्या सरकारची घोषणा केलीय. अब्दुल गनी बरादर हे अफगाणिस्तानचे उप प्रधानमंत्री आहेत.
नक्की वाचा >> “PhD, Master’s सारख्या पदव्या महत्वाच्या नाहीत, आमच्या नेत्यांकडे…”; तालिबानच्या शिक्षणमंत्र्यांचं वक्तव्य
येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओ आणि क्वाड समुहाच्या बैठकींमध्ये सहभागी होणार असल्याने या बैठकींना विशेष महत्व प्राप्त झालं आहे. या दोन्ही संघटनांमध्ये अमेरिका आणि रशिया महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळेच दोन्ही देशांना अफगाणिस्तानमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी भारताची मदत आवश्यक वाटत आहे.