काबूलमध्ये तालिबानचे सशस्त्र बंडखोर घुसले आणि अफगाणिस्तान पडल्याचं स्पष्ट झालं. अफगाणिस्तानचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडून अबु धाबीमध्ये आश्रय घेतला. काबूलमधील सर्व सरकारी इमारतींवर तालिबान्यांनी आपला अंमल प्रस्थापित केला. त्यामळे संपूर्ण अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेल्याचं आख्ख्या जगानं मान्य केलं. पण अफगाणिस्तानच्या माजी उपराष्ट्राध्यक्षांच्या एका ट्वीटने जागतिक स्तरावर देखील आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आख्खं जग अफगाणिस्तान पडल्याच्या चिंतेत असताना अचानक अमरुल्लाह सालेह यांनी केलेल्या ट्वीटमुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी देशाचा काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष”

तालिबानचं सरकार कसं असेल, या चिंतेत असणाऱ्या जगाला अमरुल्लाह सालेह यांनी “मी देशाचा काळजीवाहू अध्यक्ष आहे”, असं सांगितलं आहे. अमरुल्लाह यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी याविषयी स्पष्टीकरण देखील दिलं आहे. “अफगाणिस्तानच्या राज्यघटनेनुसार राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थिती, पलायन, राजीनामा किंवा मृत्यूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत FVP अर्थात First Vice President देशाचा काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष होतो. मी अजून माझ्या देशातच आहे. आणि मी देशाचा कायदेशीररीत्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष आहे. मी सर्व नेत्यांशी चर्चा करून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे”, असं अमरुल्लाह सालेह यांनी म्हटलं आहे.

 

तालिबान्यांपुढे शरणागती कदापि नाही!

दरम्यान, स्वत: काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष असल्याचं स्पष्ट करतानाच अमरुल्लाह सालेह यांनी आपण तालिबान्यांपुढे कदापि शरणागती पत्करणार नसल्याचं देखील स्पष्ट केलं आहे.

 

“मी कधीही किंवा कोणत्याही परिस्थितीत तालिबानी दहशतवाद्यांपुढे शरणागती पत्करणार नाही. माझे हिरो अहमद शाह मसूद यांच्या आत्म्याला किंवा वारशाला मी कधीही फसवणार नाही. मला ऐकणाऱ्या लाखो लोकांचा मी कधीच अपेक्षाभंग करणार नाही. मी कधीही तालिबान्यांसोबत एकत्र राहणार नाही. कधीच”, असं अमरुल्लाह सालेह यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

 

४८ वर्षीय अमरुल्लाह सालेह हे एक माजी गुप्तहेर आहेत. सालेह यांनी अशरफ घनी यांच्याप्रमाणे देश सोडलेला नसून सध्या ते अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात असल्याचं सांगितलं जात आहे. या भागामध्ये अजूनही तालिबान्यांचा पूर्णपणे अंमल प्रस्थापित झालेला नाही. तालिबान्यांविरोधात अफगाणी ताकद गोळा करण्याचा सालेह प्रयत्न करत आहेत. अहमद मसूद आणि माजी संरक्षण मंत्री बिस्मिल्लाह मोहम्मदी यांनी देखील मदतीचं आश्वासन दिलं आहे.

तालिबानची भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी केली तुलना, खासदार अडचणीत; देशद्रोहाचा गुन्हा दाखल!

अहमद मसूद हे अफगाणी कमांडर अहमद शाह मसूद यांचे पुत्र आहेत. १९९६ ते २००१ या कालावधीमध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता होती. मात्र, या काळात देखील तालिबान्यांना अहमद शाह मसूद यांच्यामुळे पंजशीर खोऱ्यावर अंमल प्रस्थापित करता आला नव्हता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghanistan defiant vice president amrullah saleh tweet after taliban take over pmw