भारताचा शेजारी देश असलेल्या अफगाणिस्तानने आजपासून भारतातील त्यांचा दूतावास बंद करण्याची घोषणा केली आहे. इथल्या सरकारकडून आणि मुत्सद्द्यांकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचं अफगाणिस्तानच्या दूतावासाने स्पष्ट केलं आहे. इस्लामिक रिपब्लिकन ऑफ अफगाणिस्तानच्या दूतावासाने रविवार, १ ऑक्टोबर २०२३ पासून भारतातील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. या निवेदनात दूतावासाने म्हटलं आहे की नवी दिल्लीतल्या अफगाणिस्तानच्या दूतावासाने आजपासून भारतातलं आमचं कामकाज बंद करण्याचा निर्णय जाहीर करताना आम्हाला खूप निराशा, दुःख आणि खेद वाटतोय.
खरंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचं राज्य आल्यानंतरही तिथल्या आधीच्या सरकारचा भारतातील दूतावास सुरू होता. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर भारतातला त्यांचा अधिकृत राजदूत कोण यावरून अलिकडेच मोठा गदारोळ झाला होता. अशातच आता अफगाणिस्तानने आजपासून भारतातील त्यांचा दूतावास बंद केला आहे. यजमान सरकारकडून आम्हाला पुरेसा पाठिंबा मिळत नाहीये, त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या हितांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यजमान सरकारला अपयश आलं असल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं दूतावासाने म्हटलं आहे.
अफगाणिस्तानने निवेदनात म्हटलं आहे की भारताबरोबरचे आमचे ऐतिहासिक संबंध आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरील वेगवेगळ्या भागीदाऱ्या पाहता हा निर्णय क्लेशदायक असला तरी आम्ही तो खूप काळजीपूर्वक आणि योग्य विचारविनिमय करून घेतला आहे. एकीकडे भारताकडून आम्हाला पुरेसं समर्थन मिळत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला काबूलमध्ये वैध सरकारही नाही. त्यामुळेच आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो आहोत.
हे ही वाचा >> सूर्याच्या दिशेने झेपावणाऱ्या Aditya-L1 बाबत मोठी अपडेट, ISRO चा दुसऱ्यांदा मोठा पराक्रम, एका महिन्यात ‘इतकं’ अंतर पार
दरम्यान, दूतावास स्थलांतरित होईपर्यंत दूतावासाच्या भारतातील वाणिज्य सेवा सुरू राहतील असंही दूतावासाने स्पष्ट केलं आहे. अफगाणिस्तानी दूतावासातील राजदूत आणि इतर अधिकाऱ्यांनी भारत सोडून युरोप आणि अमेरिकेत आश्रय घेतला आहे. पाच अधिकाऱ्यांनी नुकताच देश सोडला. तसेच नवी दिल्लीतलं कामकाज थांबवण्याबद्दल दूतावासाने आधीच भारत सरकारला कळवलं होतं.