अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबाननं सत्ता स्थापन केली आहे. अफगाणिस्तान सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत. सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला असून ते ताजिकिस्तानला रवाना झाले आहेत, अशी माहिती टोलो न्यूजने दिली आहे. उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडला आहे. अमेरिकन सैनिकांनी अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर तालिबान सक्रिय झालं होतं. अवघ्या १०० दिवसात तालिबाननं अफगाणिस्तानवर सत्ता मिळवली आहे. शांततापूर्वक मार्गाने सत्तांतरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सत्ता मिळवल्यानंतर तालिबानं जनतेला घाबरण्याची आवश्यकता नाही असा संदेश दिला आहे. आता अली अहमद जलाली अफगाणिस्तानचे पुढचे राष्ट्रपती असतील, असं बोललं जात आहे. “काबुलमधील लूट आणि गोंधळ रोखण्यासठी तालिबान काबुलमध्ये प्रवेश करणार आहे. पोलिसांनी घाबरण्याची गरज नाही”, असं तालिबानी प्रवक्त्याने सांगितलं आहे.
शनिवारी तालिबाननं जलालाबादवर ताबा मिळवला होता. यानंतर काबुल शहरच उरलं होतं. काबुल हे शहर तालिबान दहशतवाद्यांपासून सुरक्षित मानलं जातं होतं. मात्र आता या शहरावरही तालिबानने कुच केली आहे. जलालाबादवर ताबा मिळवत तालिबानने राजधानी काबुलला देशाच्या पूर्व भागापासून वेगळं केलं होतं. जलालाबादच्या राज्यपालांना कोणताही संघर्ष न करता आत्मसमर्पण केलं होतं. सामान्य नागरिकांचं नुकसान टाळण्यासाठी त्यांनी असं केलं आहे.
Afghanistan President Ashraf Ghani has left that country, reports TOLOnews quoting sources
(File photo) pic.twitter.com/yOvHUyfjO4
— ANI (@ANI) August 15, 2021
अमेरिकेने ९/११ हल्ल्यासाठी अल कायदाला जबाबदार धरलं होतं. यासाठी अमेरिकेने २००१ मध्ये अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं तालिबानला बाहेर केलं. त्यानंतर देशाच्या सुरक्षेसाठी अफगान सुरक्षा दल आणि पोलिसांना प्रशिक्षण दिलं. अमेरिकेने गेल्या २० वर्षातील युद्धात २० खरब डॉलर खर्च केले आणि २,३१२ सैनिक शहीद झाले आहेत.
तालिबानचा उदय कसा झाला?
सोव्हिएत सैन्याच्या माघारीनंतर विविध समूहात विभागलेल्या संघटना आपापसात लढू लागल्या होत्या. या दरम्यान १९९४ मध्ये या समूहातून एक सशस्त्र गट उदयास आला आणि १९९६ पर्यंत त्याने अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर ताबा मिळवला. त्यानंतर संपूर्ण देशात इस्लामिक कायदा लागू केला.