अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तान सोडल्यानंतर माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देश सोडून गेलेल्या अमेरिकेच्या शेवटच्या सैनिकाच्या बॅगमध्ये ते अफगाणिस्तान पॅक करुन घेऊन गेलेले नाहीत असा खोचक टोला लगावत संघर्ष सुरु राहणार असल्याचं सालेह यांनी स्पष्ट केलं आहे. नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या नेतृत्वाखालील फौजांना स्थानिकांचा पाठिंबा असून ते सध्या पंजशीर आणि कापीसामध्ये तालिबान्यांविरोधात लढत आहेत.
नक्की पाहा >> Video: अमेरिकेच्या लष्कराने देश सोडताच तालिबान्यांनी हेलिकॉप्टरला मृतदेह लटकवून केलं उड्डाण
अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता सालेह यांनी, “अफगाणिस्तान ते काही शेवटच्या सैनिकाच्या बॅगमध्ये पॅक करुन घेऊन गेलेले नाहीत. देश इथेच आहे. नद्या अजून वाहतायत, डोंगर अजूनही भक्कपणे उभे आहेत. तालिबानी येथील लोकांना आवडत नाहीत आणि त्यांच्याविरोधात येथे द्वेष आहे. म्हणूनच संपूर्ण देशातील लोकांना सध्या देशाबाहेर पडायचं आहे. सुपर पॉवर म्हणवणाऱ्या अमेरिकने ते मिनी पॉवर असल्याचं दाखवून दिलं, पण हरकत नाही,” अशा शब्दांमध्ये अमेरिकेला टोला लगावलाय.
नक्की वाचा >> पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचं तालिबानला खुलं समर्थन, म्हणाला, “ते जबरदस्त…”
यापूर्वीच्या मुलाखतीमध्ये सालेह यांना अमेरिका अफगाणिस्तान सोडून जाईल यासंदर्भात विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी, “अमेरिकेने उद्या देश सोडायचं ठरवलं तर आमचा त्या निर्णय़ावर काहीच प्रभाव पडणार नाही. आम्ही फक्त त्यांना आमची कथा सांगू शकतो. त्यांना आपलं संयुक्त ध्येय काय होतं याची आठवण करुन देऊ शकतो. आपला एकच शत्रू कोण आहे हे पुन्हा सांगू शकतो पण त्यांनी जायचं ठरवलं तर तो त्यांचा निर्णय असेल,” असं म्हटलं होतं.
This is a leader. An Afghan, true to his land and his people. This is why @AmrullahSaleh2 inspires so many as their leader and keeps their hopes alive. pic.twitter.com/LGlo8vDKXz
— Tarek Fatah (@TarekFatah) August 29, 2021
कोण आहेत सालेह?
४८ वर्षीय अमरुल्लाह सालेह हे एक माजी गुप्तहेर आहेत. सालेह यांनी अशरफ घनी यांच्याप्रमाणे देश सोडलेला नसून सध्या ते अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात असल्याचं सांगितलं जात आहे. या भागामध्ये अजूनही तालिबान्यांचा पूर्णपणे अंमल प्रस्थापित झालेला नाही. तालिबान्यांविरोधात अफगाणी ताकद गोळा करण्याचा सालेह प्रयत्न करत आहेत. अहमद मसूद आणि माजी संरक्षण मंत्री बिस्मिल्लाह मोहम्मदी यांनी देखील मदतीचं आश्वासन दिलं आहे.
अहमद मसूद हे अफगाणी कमांडर अहमद शाह मसूद यांचे पुत्र आहेत. १९९६ ते २००१ या कालावधीमध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता होती. मात्र, या काळात देखील तालिबान्यांना अहमद शाह मसूद यांच्यामुळे पंजशीर खोऱ्यावर अंमल प्रस्थापित करता आला नव्हता.
नक्की वाचा >> “…तर किमान बॉम्ब तरी टाका”; अफगाणिस्तानसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांची बायडेन प्रशासनाकडे मागणी
पंजशीरवर हल्ला…
अमेरिकेने देश सोडताच तालिबान्यांनी पंजशीरवर हल्ला केला आहे. मात्र या हल्ल्यात तालिबानला मोठे नुकसान झाले. तालिबानला नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांकडून सडेतोड उत्तर मिळाले आहे. या संघर्षामध्ये ८ तालिबानी ठार झाले आहेत. तालिबानच्या विरोधात लढणाऱ्या नॉर्दर्न अलायन्सने दावा केला आहे की, सोमवारी रात्री तालिबान लढाऊंनी पंजशीर खोऱ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला आणि या लढाईत ८ तालिबानी मारले गेले. पंजशीर हा एकमेव प्रांत आहे जो अजून तालिबानच्या ताब्यात नाही. नॉर्दर्न अलायन्सच्या मते, या लढ्यात त्यांचे देखील दोन लोक मारले गेले आहेत. तालिबानने संपूर्ण देश काबीज केला आहे, पण तो अजून पंजशीरवर नियंत्रण मिळवू शकलेला नाही. येथे अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली उत्तर आघाडीच्या लढवय्यांनी तालिबानविरुद्ध युद्ध पुकारले आहे.