अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दहशतीचं वातावरण आहे. तालिबान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा अनुभव असल्याने अनेक देशांच्या अफगाणिस्तानातील स्थितीवर नजरा लागून आहेत. दुसरीकडे दहशतीमुळे अफगाणिस्तानातून नागरिक पलायन करत आहेत. अफगाणिस्तानात तालिबानची दहशत असली तरी तालिबान्यांना पंजशीरवर ताबा मिळवण्यात अपयश आलं आहे. अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबान्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. पंजशीरमधील नागरिक तालिबानला तोडीस तोड उत्तर देतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमरुल्ला सालेह सध्या पंजशीरमध्ये आहेत. अहमद मसूद यांच्यासोबत नॉर्थन अलायंसमध्ये तालिबानशी लढ्यात मोलाची साथ देत आहेत. अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला कार्यकारी राष्ट्रपती घोषित केलं आहे.
“आम्हाला वाटतं देशातील नागरिकांना स्वतंत्रपणे जीवन जगता यावं. आम्ही अफगाणिस्तानला तालिबानीस्तान बनू देणार नाहीत. अफगाणी लोकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी. दडपशाहीत हे शक्य नाही” असं स्पष्ट शब्दात अमरुल्ला सालेह यांनी सांगितलं. तालिबानने सत्ता येताच अफगाणिस्तानातून माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाने पळ काढला आहे. “राष्ट्रपती अशरफ घनी यांनी लोकांची फसवणूक केली आहे. ते देशाला संकटात टाकून पळून गेले आहेत. पण आमचं एकच लक्ष्य आहे की, आम्ही दडपशाही सहन करणार नाही. त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ”, असंही सालेह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
“पंजशीरमधील काही भाग तालिबानच्या ताब्यात असल्याचं वृत्त चुकीचं आहे. पंजशीर तालिबानचं काहीही अस्तित्व नाही. पंजशीरमधील नागरिक सतर्क असून तालिबानसमोर झुकण्यास तयार नाहीत. आम्ही सर्व बाबतीत चर्चा करण्यास तयार आहोत. आम्हाला शांतता हवी आहे. पण जर तालिबानला लढाई करायची असेल, तर आम्हीही तयार आहोत”, असा कार्यकारी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी इशारा दिला आहे. “अहमद मसूद तालिबानशी लढा देत आहेत. प्रत्येक जण त्यांच्यासोबत उभा आहे. मी पण इथेच आहे. आमच्या सर्वांची एकजूट आहे. आता आम्ही सर्वकाही तालिबानवर सोडलं आहे. जर त्यांना लढाई हवी असेल लढाई होईल. जर त्यांना शांततापूर्वक चर्चा करायची असेल तर चर्चा होईल”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.