लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्काराचे मानकरी अपूर्व खरे यांना शांती स्वरुप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्षभराच्या विलंबाने शांती स्वरुप भटनागर पुरस्काराचे मानकरी कोण आहेत ते जाहीर झालं आहे. एकूण १२ तरुण संशोधकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. One Week One Lab या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ही नावं जाहीर करण्यात आली आहेत.
CSIR चे पहिले महासंचालक शांती स्वरूप भटनागर यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षी जीवशास्त्र, रसयानशास्त्र, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी आणि पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रहविज्ञान या शाखांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि पाच लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) या संस्थेचे महासंचालक एन. कलैसेल्वी यांनी CSIR चे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत १२ पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर केली.
बहुआयामी गणितज्ञ अपूर्व खरे यांना भटनागर पुरस्कार जाहीर
गणिताचा बागुलबुवा अनेकांच्या मनात असला, तरी हा विषय प्रत्येकाचे आयुष्य व्यापून उरतो. बंगळूरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये सहयोगी प्राध्यापक असणारे गणितज्ञ अपूर्व खरे याचे संशोधनही अशाच विविध क्षेत्रांना स्पर्श करणारे आहे. अपूर्व यांचे गणितातील संशोधन वित्तीय क्षेत्र, हवामान बदलासंदर्भातील अभ्यास, जैवसांख्यिकी अशा विभिन्न क्षेत्रांत उपयुक्त ठरत आहे. त्याच्या ‘पॉलिमॅथ’ प्रकल्पाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. गणिती पद्धतींचा वापर करून विविध समस्या सोडवण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.
‘सायन्स अॅण्ड इंजिनीअरिग रिसर्च बोर्ड’, अमेरिकेतील ‘द डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च एजन्सी’ आणि ब्रिटनमधील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर मॅथमॅटिकल सायन्स’ने त्याच्या अभ्यासाची दखल घेतली आहे. प्रतिष्ठित अशा स्वर्ण जयंती फेलोशिप, रामानुज फेलोशिप त्यांना प्राप्त झाली आहे. कॅनडामधील मॉन्ट्रियल, पेरूमधील कुस्को येथे आणि जगातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये त्याने मांडलेले विचार उल्लेखनीय ठरले आहेत.
या पुरस्काराचे मानकरी कोण कोण ठरले आहेत?
जीवशास्त्र विभाग
डॉ. अश्विनी कुमार
डॉ. मद्दिका सुब्बा रेड्डी
रसायनशास्त्र विभाग
डॉ. अक्काटू टी बिज्जू
डॉ. देबब्रता मैती
पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रहविज्ञान
डॉ. विमल मिश्रा
अभियांत्रिकी विज्ञान
डॉ. रंजन साहो
डॉ. रजनीश कुमार
गणित
डॉ. अपूर्व खरे
डॉ. नीरज कायल
वैदकशास्त्र
डॉ. दीपयमन गांगुली
भौतिकशास्त्र
डॉ. अनिज्ञा दास
डॉ. बसुदेब दासगुप्ता
अशी पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व विजेत्यांची नावं आहेत.