Bengaluru cop Suicide: बंगळुरूतील अभियंता अतुल सुभाष यांनी काही दिवसांपूर्वीच (९ डिसेंबर) पत्नी आणि सासरच्या नातेवाईकांना कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्यांवर जोरदार टीका होऊ लागली. आता पुन्हा एकदा बंगळुरूतच एका पोलीस शिपायाने पत्नी आणि सासऱ्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव एचसी थिपन्ना (वय ३४) असल्याचे समजते. बंगळुरूच्या हुलिमावु वाहतूक पोलीस ठाण्यात ते वरीष्ठ शिपाई म्हणून काम करत होते.
हीलालिगे रेल्वे स्थानक येथे शुक्रवारी रात्री थिपन्ना यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. थिपन्ना यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी आणि सासऱ्यांवर आरोप केले आहेत. त्यांच्या छळाला कंटाळूनच आपण आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेतला, असे या चिठ्ठीत लिहिण्यात आले आहे. पत्नी आणि सासऱ्यांनी आपल्या जीविताला धोका निर्माण केला होता, असेही थिपन्ना यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.
थिपन्ना यांनी लिहिले की, १२ डिसेंबर रोजी सासरे यमुनप्पा यांनी सायंकाळी ७.२६ वाजता मला फोन केला तब्बल १४ मिनिटांच्या कॉलमध्ये त्यांनी मला धमकी दिली. तसेच दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी माझ्या मरणाची अपेक्षा व्यक्त केली. मी मेलो तरी त्यांची मुलगी माझ्याशिवाय आनंदी राहू शकेल, असे बोलून त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केले.
सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५१(३) आणि कलम ३५२ नुसार गुन्हा दाखल केला.
अतुल सुभाष यांची आत्महत्या
बंगळुरूमधील ऑटोमोबाइल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या ३४ वर्षीय अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून सोमवारी (९ डिसेंबर) आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ८१ मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून २४ पानांची सुसाइड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी आपल्या शेवटच्या १२ इच्छा व्यक्त केल्या आहेत. अतुल सुभाष यांच्यावर त्यांच्या पत्नीने नऊ गुन्हे दाखल केले होते. न्यायालयीन प्रक्रियेला कंटाळून अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.
अतुल सुभाष हे मुळचे उत्तर प्रदेशमधील असून त्यांनी सोमवारी बंगळुरूच्या मुन्नेकोलाल येथे राहत्या घरी आत्महत्या केली. अतुल यांचा भाऊ विकास कुमार यांनी अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा, भाऊ अनुराग आणि काका सुशील यांच्याविरोधात बंगळुरूच्या मराठाहळ्ळी पोलीस ठाण्यात आत्महत्येक प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.