मंगळवारी झालेल्या चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मनोजकुमार सोनकर यांचा विजय झाला आहे. इंडिया आघाडीची ही पहिलीच निवडणूक होती. या पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. भाजपाच्या मनोजकुमार सोनकर यांनी आप-काँग्रेसचे संयुक्त उमेदवार कुलदीप सिंग यांचा पराभव केला.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाने आणि प्रचंड वादानंतर चंदीगड महापौर पदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस आणि आप यांची आठ मते अवैध ठरवण्यात आल्याने भाजपाचा विजय झाला आहे. या निवडणुकीला इंडिया आघाडीचं लिटमस टेस्ट म्हटलं जात होतं. यातच पहिल्याच इंडिया आघाडीच्या निवडणुकीत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे.
महापालिकेचे उपायुक्त विनय प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत ही मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी १० वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणार होती. परंतु, उपायुक्त आणि भाजपचे काही नगरसेवक उशिरा आल्याने मतदान प्रक्रियेला सुरुवात होण्यास तासभर उशीर झाला.
खासदार किरण खेर सभागृहाची पदसिद्ध सदस्य आहेत. त्यांनी प्रथम मत दिले. त्यानंतर तासभर चाललेल्या या प्रक्रियेत एकूण ३६ मते पडली. यापैकी आप आणि काँग्रेसला मिळून २० मते मिळाली. तर, भाजपाला १५ मते मिळाली. तर, एक मत खेर यांच्याकडे होतं.
सुरुवातीला १८ जानेवारी रोजी होणारी निवडणूक पीठासीन अधिकारी आजारी पडल्याने ६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या स्थगितीबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर, न्यायालयाने ३० जानेवारी रोजी मतदान घेण्याचे निर्देश दिले.