ISRO च्या मिशन चांद्रयान ३ च्या यशानंतर भारताने नवा इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चांद्रयान ३ च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोच्या सगळ्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे. ज्या जागी चांद्रयानाने सॉफ्ट लँडिंग केलं त्या जागेला शिवशक्ती पॉईंट असंही नाव देण्यात आलं आहे. यानंतर आता हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा अशी मागणी केली आहे.
चांद्रयान ३ च्या यशानंतर हिंदू महासभा राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करावं अशी मागणी केली आहे. त्यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा अशी मागणी केली आहे. भारताच्या संसदेने चंद्र ग्रहाला हिंदू राष्ट्र घोषित केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. चांद्रयान ३ ज्या ठिकाणी लँड झालं त्या जागेला शिवशक्ती पॉईंट असं नाव देण्यात आलं आहे. ती जागा म्हणजे चंद्राची राजधानी व्हावी आणि कुठल्याही जिहादी विचारसरणीच्या माणसाला तिथे जाऊ देता कामा नये या आशयाचं ट्विट चक्रपाणी महाराज यांनी केलं आहे.
हे पण वाचा- “मी देवळांत का जातो?”, इस्रोच्या अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं
स्वामी चक्रपाणी महाराज यांनी अशा प्रकारे वक्तव्य करण्याची ही पहिली वेळ नाही. २०२० मध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. त्यावेळी चक्रपाणी महाराजांनी गोमूत्र पार्टीचं आयोजन केलं होतं. करोनापासून वाचण्यासाठी गोमूत्र प्या असा अजब सल्लाही त्यांनी त्यावेळी दिला होता.
प्राणी मारुन खाणाऱ्या लोकांमुळे करोना वाढतो आहे, करोना व्हायरस त्यांच्यामुळेच आला आहे असाही दावा त्यावेळी चक्रपाणी महाराजांनी केला होता. प्राणी मारला की त्या ठिकाणी एक प्रकारची उर्जा निर्माण होते ही उर्जाच विनाशाचं कारण ठरते असंही वक्तव्य चक्रपाणींनी केलं होतं.