अरूणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांना प्रमाणित नावे देण्याच्या चीनच्या खेळीनंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठणकावून सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाने गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. नाव बदलून अनधिकृतपणे कब्जा मिळवलेला प्रदेश कायदेशीर होऊ शकत नाही. अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागवे यांनी सांगितले.

धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल भेटीने खवळलेल्या चीनने  अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांना अधिकृत ‘प्रमाणित’ नावे जाहीर केल्याचे सांगत चीनने भारतावर कुरघोडीचा प्रयत्न केला होता. चीनच्या नागरी कामकाज मंत्रालयाच्या हवाल्याने चिनी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले होते. चिनी, तिबेटी आणि रोमन वर्णाक्षरांद्वारे अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांचे १४ एप्रिलला नामकरण करण्यात आले. व्योग्यानिलग, मिला री, कोइंदोरबो री, मनकुका, बुमो ला व नमकापूब री अशी ही नावे आहेत.

भारत-चीन यांच्यातील ३,४८८ किलोमीटर लांबीच्या सीमेबाबत वाद असून, चीनने अरुणाचल हा दक्षिण तिबेट असल्याचे सांगून त्यावर दावा केला आहे. चीनने १९६२ च्या युद्धात अक्साई चीनचा भाग बळाकावलेला आहे, असा भारताचा दावा आहे. दोन्ही देशांत विशेष प्रतिनिधी पातळीवर सीमाप्रश्नी चर्चेच्या १९ फेऱ्या झाल्या आहेत. दलाई लामा यांनी काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशला भेट दिली. त्यावर संतापलेल्या चीनने सार्वभौमत्वासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, असा इशारा दिला होता.

Story img Loader