उत्तर प्रदेशात शहरांची नावं बदलली जात असल्याने विरोधकांकडून नाराजी जाहीर केली असताना एक अजब प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश उच्च शिक्षण सेवा आयोगाच्या (UPHESC) वेबसाईटवर चक्क काही प्रसिद्ध कवींची आडनावंच बदलण्यात आली आहे. त्यांचं आडनाव ‘इलाहाबादी’ ऐवजी ‘प्रयागराज’ असं लिहिण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होता आहे. योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारने तीन वर्षांपूर्वी अलाहबाद शहराचं नाव बदलून प्रयागराज केलं होतं.

वेबसाईटवरील अलाहाबाद ‘About Allahabad’ विभागात प्रसिद्ध कवी अकबर इलाहाबादी, तेग इलाहाबादी आणि राशीद इलाहाबादी यांची आडनावं बदलण्यात आली असून अकबर प्रयागराज, तेग प्रयागराज आणि राशीद प्रयागराज असा उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान प्रसिद्ध कवींचं आडनावं बदलण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. प्रसिद्ध कवी शैलेंद्र माथूर, काँग्रेस नेते इर्शाद उल्लाह आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी याप्रकरणी नाराजी जाहीर केली आहे.

ओवेसी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “शहर काय आणि शायर काय? बाबा उत्तर प्रदेशातील प्रत्येकाचं नाव बदलत आहे”.

वेबसाईट हॅक झाल्याचा दावा

याप्रकरणी उत्तर प्रदेश उच्च शिक्षण सेवा आयोगाच्या अधिकाऱ्याने स्पष्टीकरण देताना वेबसाईट मंगळवारी हॅक झाली होती आणि तेव्हा या नावांमध्ये बदल करण्यात आला असा दावा केला आहे.

“अलाहाबाद शहराचं नाव बदलल्याने नाराज असलेल्या काहीजणांनी हे कृत्य केल्याचं दिसत आहे,” असं आयोगाचे अध्यक्ष ईश्वर चरण विश्वकर्मा यांनी म्हटलं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, हिंदी वेबसाईट पूर्ववत झाली असून इंग्लिश वेबसाईट पूर्ववत केली जात आहे. दरम्यान याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Story img Loader