झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली आहे. आज ईडीने हेमंत सोरेन यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. जमीन घोटाळा प्रकरणात आज हेमंत सोरेन यांची चौकशी करण्यात आली. काही तासांच्या चौकशीनंतर हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी काही वेळापूर्वीच त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यानंतर हेमंत सोरेन यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे झारखंडमध्ये राजकीय संकट निर्माण झालं आहे. इंडियन एक्स्प्रेसने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जमीन घोटाळा प्रकरणात ईडीकडून चौकशी त्यानंतर अटक

झारखंडमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली. यानंतर हेमंत सोरेन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनात पोहोचले. दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे आमदारही रांची येथील राजभवनात पोहोचले. चंपई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केल्याचे सांगण्यात येतं आहे. चंपई सोरेन यांना ४१ हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. ८० सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठीची मॅजिक फिगर ४१ आहे.

जमीन घोटाळा प्रकरण आहे काय?

ईडीने रांचीमध्ये लष्कराच्या ताब्यात असलेल्या ४.५५ एकर जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीची चौकशी सुरू केली. या प्रकरणी ईडीनं रांचीच्या बडागाईन झोनचे महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांना अटक केली होती. त्यांच्या राहत्या घरातून मोठ्या प्रमाणात सरकारी कागदपत्रं आणि मोबाईलही त्यावेळी जप्त करण्यात आले होते. त्यानंतर ईडीने आपला मोर्चा हेमंत सोरेन यांच्याकडे वळवला.

प्रदीप बागची, विष्णू कुमार अग्रवाल, भानू प्रताप प्रसाद आणि इतरांविरुद्ध झारखंड पोलीस आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी दाखल केलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडीनं मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना ईडीनं आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं भूमाफियांच्या नावे फसवणूक करून भूखंड हस्तांतरित केल्याचं तपासात उघड झालं आहे. यानंतर हेमंत सोरेन यांच्या अटकेवरुन काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळतं आहे.

देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने हेमंत सोरेन यांची अटक होण्याची ही घटना महत्त्वाची मानली जाते आहे. देशात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. हेमंत सोरेन यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजपावर सडकून टीका केली जात आहे. जे मोदींबरोबर नाहीत त्यांना अटक केली जाते आहे किंवा त्यांच्यावर कारवाई होते आहे अशी टीका मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After day of questioning jharkhand former cm hemant soren arrested by ed scj