देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाचा करोनाच्या विषाणूंचे नवे प्रकार समोर येत आहेत. हा विषाणू म्युटेट होत असून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा प्रसार होऊ लागला आहे. आत्तापर्यंत करोनाच्या अल्फा, डेल्टा, डेल्टा प्लस अशा प्रकारांची चर्चा असताना आता करोनाच्या कप्पा विषाणू (Kappa Variant) चे रुग्ण सापडू लागले आहेत. राजस्थानमध्ये क कप्पा व्हेरिएंटचे ११ रुग्ण आढळले आहेत. राज्याचे वैद्यकीय व आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. याआधी उत्तर प्रदेशमध्ये करोनाच्या कप्पा व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले होते.

करोना विषाणूच्या कप्पा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या ११ रुग्णांपैकी चार जण अलवर आणि जयपूरचे, दोन बाडमेर आणि एक भिलवारा येथील आहेत. जनुकीय सर्वेक्षणनंतर या प्रकरणांची माहिती मिळाली, असे डॉ. रघु शर्मा म्हणाले. डेल्टा प्रकारापेक्षा कप्पा व्हेरिएंट कमी प्राणघातक आहे असे वैद्यकीय मंत्री म्हणाले. मंगळवारी राजस्थानमध्ये २८ नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात ६१३ उपचाराधीन रूग्ण आहेत.

यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये कप्पाच्या व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले होते. . राजस्थानमध्ये बोलताना आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मंगळवारी चोवीस तासांत करोनाचे २८ नवीन रुग्ण आढळले आहेत. मात्र करोनामुळे राज्यात कोणत्याही नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही. यासह, करोना व्हायरस संसर्ग झालेल्यांची संख्या ९ लाख ५३ हजार १८७ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ८,९४५ जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात सध्या ६१३ सक्रिय रुग्ण आहेत.

करोनाच्या स्ट्रेनचं WHOकडून नामकरण; भारतातील स्ट्रेन ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’

कप्पा विषाणूवर उपचार शक्य

दरम्यान, याआधी देखील उत्तर प्रदेशमध्ये कप्पा विषाणूचे रुग्ण सापडल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिली होती. “याआधी देखील कप्पा व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात आढळून आले होते. हा व्हायरल अद्याप चिंतेचं कारण नाही. हा करोना विषाणूचा व्हेरिएंट आहे आणि त्यावर उपचार करणं शक्य आहे”, असं प्रसाद यांनी सांगितलं होतं. मात्र, कप्पा व्हेरिएंटचे हे रुग्ण नेमके राज्याच्या कोणत्या भागात सापडले, याची माहिती मात्र त्यांनी दिलेली नव्हती. दरम्यान, कप्पा विषाणूची रुग्णसंख्या अत्यल्प असली, तरी डेल्टा आणि अल्फाप्रमाणेच कप्पा विषाणू देखील वेगाने प्रसार होणारा असल्याचं सांगितलं जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२०मध्ये कप्पा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळून आला होता. या व्हेरिएंटला B.1.617.1 तर डेल्टा व्हेरिएंटला B.1.617.2 असे कोड देण्यात आले आहेत. मात्र, कप्पा व्हेरिएंटची रुग्णसंख्या आणि प्रसार पाहाता अजूनपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू चिंतेचं कारण ठरला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.