आतापर्यंत डेंग्यूचे १७ बळी; पायाभूत सुविधा अपुऱ्या; औषधे उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा
दिल्ली सध्या डेंग्यूने मेटाकुटीस आली असताना आता तेथे स्वाइन फ्लूचे संकट जोर धरण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचा विषाणू तेथे फैलावण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्लू हा एच१एन१ इन्फ्लुएंझा विषाणूमुळे होतो. हा विषाणू तापमान कमी झाले की थंडीच्या सुरुवातील येतो. हा विषाणू हवेतून पसरतो कीटकातून नाही. त्यामुळे त्याचा प्रसार वेगाने होतो. डेंग्यूने या मोसमात नवी दिल्लीत १७ बळी घेतले आहेत.
वयस्कर लोक, मधुमेही, मूत्रपिंड विकारग्रस्त, कर्करोगग्रस्त व गर्भवती मातांना स्वाईन फ्लू होण्याची शक्यता जास्त असते असे सफदरजंग रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ. जे.सी . सुरी यांनी सांगितले. एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी स्वाईन फ्लूचे रुग्ण जास्त होते व पायाभूत यंत्रणा अपुरी पडली होती. त्यामुळे यावेळी स्वाईन फ्लूचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. स्वाइन फ्लूमध्ये ओपीडी सेवा कमी पडते व काही रुग्णांना वेगळे ठेवावे लागते तेवढी जागाही नसते. मनुष्यबळ अपुरे असते. एच१एन१ हा संसर्गजन्य रोग असल्याने शिकंणे, खोकणे व व्यक्तीच्या संपर्कात येणे यामुळे तो होतो.
हिवाळा जवळ आल्याने आता स्वाईन फ्लू जोरात राहील त्यामुळे निदान संच व इतर सामुग्री व औषधे मोठय़ा प्रमाणावर आवश्यक आहे व त्यांचा साठा आमच्याकडे तयार आहे असे सार्वजनिक आरोग्य खात्याचे अतिरिक्त संचालक डॉ. चरण सिंग यांनी सांगितले.
दिल्लीत १२ बळी
स्वाईन फ्लू हा श्वसनमार्गाचा रोग असून तो टाइप ए इन्फ्लुएंझा या विषाणूमुळे होतो व त्यात टॅमीफ्लू हे औषध दिले जाते पण ते डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळत नाही. स्वाईन फ्लूने गेल्या वर्षी दिल्लीत १२ बळी घेतले व ४२५९ लोकांना त्याची लागण झाली होती.

स्वाईन फ्लू लक्षणे-उपाय..
कारण-एच१ एन१ विषाणू
लक्षणे- ताप, खोकला, अशक्तपणा
प्रकार- संसर्गजन्य
प्रसार- हवेतून विषाणू पसरतात, शिंकणे, खोकणे यातूनही प्रसार
उपाय- टॅमी फ्लू (डॉक्टरांच्या परवानगीने)
अनुकूल काळ- पावसाळा संपून थंडीची सुरुवात

दिल्ली मेट्रोची डेंग्यूविरोधी मोहीम
शहरातील डेंग्यूची परिस्थिती चिंताजनक झाल्यामुळे दिल्ली मेट्रोने डेंग्यूविरोधी जनजागृती मोहीम राबवली असून सूचना फलकांद्वारे डेंग्यूचे उपाय सुचविण्यात आले आहेत.
मेट्रोने ३०० मोठे पोस्टर तयार केले असून यावर डेंग्यूविरोधी उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. हे पोस्टर शहरातील विविध स्थानकांवर लावण्यात आले आहेत. दिल्ली मेट्रोचे प्रवक्ते म्हणाले की, २७ लाख प्रवासी दररोज मेट्रोने प्रवास करतात. त्यांना डेंग्यूविषयी जागरूक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आम्ही ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. मेट्रो स्थानकांवर इलेक्ट्रिक बोर्डवरही डेंग्यूची माहिती देण्यात येत आहे. तसेच नागरिकांसाठी व्याखाने आयोजित करण्यात आली आहेत.