गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी तिथे अत्यंत तणावाची स्थिती होती. मात्र त्या परिस्थितीतही भारतीय लष्कराने रणनितीक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेल्या पुलाचे बांधकाम पूर्ण केले. भारतीय लष्कराच्या इंजिनिअर्सना गलवान नदीवर अत्यंत वेगाने पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

६० मीटर लांबीच्या या पुलामुळे भारतीय लष्कराच्या तुकडयांना अत्यंत वेगाने नियंत्रण रेषेजवळ पोहोचता येईल. गुरुवारी दुपारी हा पूल बांधून पूर्ण झाला. लष्कराच्या इंजिनिअर्सनी दोन तास या पुलावर वाहनांची चाचणी घेतली. या पुलामुळे भारतीय लष्कराला नियंत्रण रेषेजवळ वेगाने हालचाल करता येणार, हे चीनला ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी या पूल बांधणीला प्रचंड विरोध केला होता. पण भारताने चीनच्या दादागिरीला कुठेही किंमत न देता अत्यंत वेगाने हा पूल बांधून पूर्ण केला. हा पूल एक प्रकारे चीनच्या दादागिरीला उत्तर आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

सोमवारी रात्री या पुलापासून काही अंतरावरच मोठा रक्तरंजित संघर्ष झाला होता. लष्कराच्या कारु स्थित माऊंटन डिव्हिजनने लष्कराच्या इंजिनिअर्सच्या युनिटला अजिबात विलंब न लावता लवकरात लवकर या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. रणनितीक दृष्टीने हा पूल महत्वाचा असल्याने सैन्य तुकडयांना बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी इंजिनिअर्सना सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश देण्यात आले होते. मंगळवारी आणि बुधवारी रात्री अत्यंत कडाक्याच्या थंडीतही या पुलाचे बांधकाम सुरु होते.

भारतीय लष्कराचे कमांडर मेजर जनरल अभिजीत बापट १६ जून रोजी सकाळी पेट्रोल पॉईंट १४ जवळ चिनी सैन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांना या पुलाच्या बांधकामात कितपत प्रगती झालीय, त्याची माहिती देण्यात आली. कुठल्याही परिस्थितीत काम थांबवायचे नाही हा आदेश लष्कराच्या इंजिनिअर्सना देण्यात आला होता.

भारताकडून या भागात इन्फ्रस्ट्रक्चर उभारणीचे जे काम सुरु आहे, त्यात या पुलावर चीनचा मुख्य आक्षेप होता. या पुलामुळे भारतीय लष्कराची क्षमता वाढणार हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे हा पूल उभारायला त्यांचा विरोध होता. पण आता हा पूल बांधून पूर्ण झाला असून इथून वाहतुकही सुरु झाली आहे. श्योक नदीच्या पूर्वेला डीएसडीबीओ रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. त्यावरही चीनला आक्षेप आहे. या पूल आणि रस्त्यामुळे फक्त गलवान खोऱ्यातच नाही तर उत्तर सेक्टरमध्येही भारताला सहजतेने हालचाल करता येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After galwan clash army engineers in 72 hours complete bridege over galwan river dmp