सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडतोय. खरं तर हे वादळ निवळले असून, त्याचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे. त्याचमुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला असून विदर्भासहीत अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. राज्यात पुढील ४८ तासांत या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे.
ओमानने दिलंय नाव
पुढील २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. इतकच नाही तर नाहीसं झालेलं हे ‘गुलाब’ चक्रवादळ पुन्हा नव्याने जन्म घेण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येतेय. महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता असून त्याचं नाव ‘शाहीन’ असं असणार आहे. हे नाव ओमानने दिलेलं आहे. या वादळाच्या निर्मितीसंदर्भात पुढील काही दिवस फार महत्वाचे ठरणार आहेत असं सांगितलं जातं आहे.
नक्की वाचा >> Explained : दरवर्षी महाराष्ट्राला वादळाचा तडाखा बसणार का?; अरबी समुद्रात नक्की काय घडतंय?
राज्यातील मुसळधार पावसाचं कारण काय?
‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले. त्यानंतर या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. मात्र, या काळात किनारपट्टीच्या भागाला या वादळाचा चांगलाच तडाखा बसला. सोमवारी चक्रीवादळ निवळले आणि त्याचे रूपांतर सध्या कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र सध्या छत्तीसगड आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचे नाव ‘शाहीन’ असं असणार आहे. सध्या भारतामधील छत्तीसगड, तेलंगण, महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक भागांमध्ये सध्या ‘गुलाब’मुळे निर्माण झालेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस पडतोय.
राज्यात पुढील २४ तासात गुलाब चक्रिवादळाच्या प्रभावामुळे मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे विदर्भात प्रभाव कमी असणार असून बुधवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव राहिल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
‘शाहीन’च्या निर्मितीची शक्यता किती?
पुढील २४ तासांमध्ये या कमी दाबाचा पट्टा जमीनीवरुन जाणार असून त्यामुळे यात बरीच उष्णता साठून राहणार असल्याचा अंदाज आहे. हा कमी दाबाचा पट्टा १ ऑक्टोबर रोजी ओमानच्या दिशेने जाईल असं सांगण्यात येत आहे. हा पट्टा पुढे सरकताना निर्माण झालेल्या वादळाला शाहीन असं नाव देण्यात येईल. ओमानने दिलेलं हे नाव अरबी समुद्र, हिंद महासागर आणि पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणाऱ्या वादळांना नाव देणाऱ्या सदस्य देशांपैकी एक असल्याने दिलं आहे. पुढील काही दिवस या वादळाच्या निर्मितीसंदर्भातील ठोस माहिती देणारे ठरणार आहेत.
किनारपट्टीला धडकणार नाही पण…
हे नवीन वादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्ट्यांवर धडकणार नसले तरी या प्रभावामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टी भागाबरोबरच गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ या प्रांतांमध्ये काही दिवस मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जातोय.
यापूर्वीही घडलेला असा प्रकार
तीन वर्षांपूर्वी म्हणजेच १० ते १९ सप्टेंबर २०१८ रोजी असाच प्रकार घडला होता. गाजा नावाचं चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ १५ नोव्हेंबर रोजी शांत झालं आणि त्याचं रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झालं. नंतर जमीनीवरुन हा कमी दाबाचा पट्टा समुद्राकडे सरकल्यानंतर अरबी समुद्रामध्ये पुन्हा या वादळाने जन्म घेतला होता.