केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) बेकायदा ठरविण्याच्या गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती मिळावी यासाठी केंद्र सरकारतर्फे शनिवारीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. सोमवारी तिची सुनावणी होण्याची शक्यता सीबीआयचे संचालक रणजीत सिन्हा यांनी व्यक्त केली.
या निकालावरून शुक्रवारी दिल्लीतील घडामोडींना वेग आला. केंद्रीय कार्मिक मंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग तसेच रणजीत सिन्हा व वरिष्ठ कायदा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सिन्हा यांनी अ‍ॅटर्नी जनरल गुलाम ई. वहाणवटी यांच्याशी आव्हान याचिकेच्या मसुद्याबाबत चर्चा केली.
निकालाचे पालनकर्ते!
गुवाहाटी न्यायालयाने सीबीआयला बेकादेशीर ठरवताच टूजी प्रकरणातले ए. राजा आणि अन्य आरोपींनी शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयातील सुनावणीसच स्थगिती देण्याची मागणी केली. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी व काँग्रेस नेते सज्जन कुमार यांनीही आपल्याबाबतचा सीबीआयचा तपास आणि आरोपपत्रच बेकायदेशीर ठरत असल्याने आपल्याला आरोपमुक्त करावे, अशी मागणी केली.
न्यायालयाची अजब तऱ्हा
ज्या गुवाहाटी न्यायालयाने सीबीआयला बेकायदा ठरविले आहे त्याच न्यायालयाने गेल्या चार वर्षांत सुमारे १० प्रकरणे सीबीआयकडे सुपूर्द केली आहेत.

Story img Loader