Neelam Shinde Accident : महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थिनी निलम शिंदे हीचा अमेरिकेत एका वाहनाच्या धडकेमुळे अपघात झाला. कॅलिफोर्निया येथे १४ फेब्रुवारी रोजी निलम शिंदेला एका वाहनाने धडक दिली होती. निलमवर सध्या अतिक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघाताची बातमी मिळाल्यानंतर निलमच्या कुटुंबियांना तात्काळ अमेरिकेला रवाना व्हायचे आहे, यासाठी त्यांनी व्हिसा मिळावा म्हणून अर्ज केला आहे. हा अर्ज मंजूर व्हावा, अशी तिच्या कुटुंबियांनी विनंती केली असून या विनंतीची लवकर पूर्तता व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान, तिच्या कुटुंबियांची मागणी मान्य झाली असून व्हिसाच्या मुलाखतीसाठी वेळ देण्यात आली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील माहिती दिली.

शुक्रवारी होणार व्हिसासाठी मुलाखत

१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या रस्ते अपघातानंतर कॅलिफोर्नियातील रुग्णालयात कोमात असलेल्या आणि हातपाय फ्रॅक्चर झालेली विद्यार्थीनी निलम शिंदेच्या वडिलांना अमेरिकेने शुक्रवारी सकाळी ९ वाजता आपत्कालीन व्हिसासाठी मुलाखत मंजूर केली आहे. निलम शिंदेच्या वडिलांनी मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासात अपॉइंटमेंट निश्चित केली आहे. यासाठी ते आज रात्री सातारा जिल्ह्यातील त्यांच्या राहत्या निवासस्थानाहून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, “सर्वांच्या मदतीनंतर आम्हाला वाणिज्य दूतावासाकडून मुलाखतीसाठी फोन आला. आम्हाला आशा आहे की आम्हाला व्हिसा मिळेल.”

परराष्ट्र मंत्रालयाच्या अमेरिका विभागाने अमेरिकन सरकारशी संपर्क साधला आहे. सूत्रांनी सांगितले की वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रवास परवाने सामान्यतः लवकर दिले जातात आणि या प्रकरणात विलंब का झाला हे स्पष्ट होत नाहीय. कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी असलेल्या निलम शिंदेला १४ फेब्रुवारी रोजी एका चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने गंभीर दुखापत झाली, यामध्ये फ्रॅक्चरचा समावेश होता.

विद्यापीठाने १६ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “निलम शिंदेची प्रकृती गंभीर असून तिचे आजारपण निश्चित झालेले नाही आणि तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.” “रुग्णाच्या वडिलांनी निलम शिंदेच्या वैद्यकीय सेवा नियोजनाचे निर्णय घेण्यासाठी यूसी डेव्हिस मेडिकल सेंटर केअर टीमला मदत करावी. निलम शिंदेच्या दुखापतींच्या स्वरूपामुळे आणि सध्या तिला ट्यूबेशन करून लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले असल्याने ती संवाद साधू शकत नाही”, असं डॉक्टरांनी सांगितलं.

..तर मिळतो आपत्कालीन व्हिसा

सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले की, कुटुंबातील एखादा सदस्य गंभीर आजारी किंवा मृत असल्यास अमेरिका ‘आपत्कालीन’ व्हिसा देते. यासाठी डॉक्टरांकडून लेखी नोंद आवश्यक आहे, जो अर्जदाराच्या देशात व्हिसा मुलाखतीच्या अपॉइंटमेंट्स जलद करण्यासाठी अमेरिकन सरकारला विनंती करू शकतो. परंतु, जलद किंवा आपत्कालीन व्हिसा अर्जांसाठी मर्यादित जागा आहेत.











Story img Loader