आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पक्षाचा प्रचारप्रमुख नेमल्यानंतर नाराज असलेल्या ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिल्यामुळे भाजपसह एनडीए पक्षांत खळबळ उडाली आहे. संयुक्त जनता दलाने धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून एनडीएला व्हेंटिलेटरची गरज असल्याचे म्हटले आहे. अडवाणींचा राजीनामा ही अतिशय गंभीर बाब असून एनडीएसाठी ही गोष्ट चांगली नाही, असे मत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी व्यक्त केले. भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांनी पदांचा दिलेला राजीनामा आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणात सक्रिय नसल्यामुळे भाजपसाठीच नव्हे तर एनडीएसाठी ही बाब चिंताजनक असून याबाबत आपल्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचेही यादव म्हणाले.
विद्यमान घडामोडी तपासून पुढील निर्णय- नितीश कुमार
पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींना पुढे केले जात असल्याच्या कृतीला संयुक्त जनता दलाचा विरोध आहे. त्यातच आता भाजपमधील नव्या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर आम्ही सर्व बाजूंनी बारकाईने अभ्यास करूनच पुढील निर्णय घेऊ, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. मोदींच्या निवडीपूर्वी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याशी आपली कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचेही कुमार यांनी सांगितले.
मोदींबाबत राजनाथ यांनी सावधान राहावे- दिग्विजय
नरेंद्र मोदी यांना पुढे जाण्यासाठी ज्या व्यक्ती मदत करतात, त्यांचेच हात मोदी कापतात. त्यामुळे भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मोदींपासून सावधान राहावे, असा सल्ला काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी राजनाथ सिंह यांना दिला. गोवा येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी अडवाणींना ज्या पद्धतीने बाजूला करण्यात आले, त्याबाबत आपल्याला खेद वाटल्याचेही दिग्विजय म्हणाले. दरम्यान, नरेंद्र मोदींमुळे काँग्रेस पक्षाला कोणत्याही प्रकारची भीती नसल्याचेही दिग्विजय सिंह म्हणाले.
अडवाणींची पक्षाला गरज;मन वळविणार – गडकरी  
नरेंद्र मोदींच्या निवडीवरून अडवाणींनी राजीनामा दिलेला नाही. कारण, जनसंघाच्या काळापासून लालकृष्ण अडवाणी यांनी पक्ष वाढविला आहे. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि पक्षालाही त्यांची गरज आहे. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी पक्षातील नेत्यांचे कसोशीचे प्रयत्न सुरू असून उद्या आपण नवी दिल्लीत जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. अडवाणींशी आजच दूरध्वनीवर बोलणे झाले. परंतु, विस्ताराने काहीच बोलता आले नाही, उद्या दिल्लीत आपणही अडवाणींना भेटणार असून त्यांनी पक्षाला मार्गदर्शन करण्याची विनंती करू, असेही गडकरी पुढे म्हणाले. गोव्यातील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहून मुंबईमार्गे गडकरी आजच नागपूरला परतले.
पक्षांतर्गत बाब- जयललिता
लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाच्या विविध पदांचा दिलेला राजीनामा ही त्यांची पक्षांतर्गत बाब असल्याचे मत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी व्यक्त केले. दरम्यान, नरेंद्र मोदी हे आपले चांगले स्नेही असून पक्षाने त्यांची प्रचारपदी निवड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत असल्याचेही जयललिता यांनी सांगितले.
व्यक्ती पक्षापेक्षा मोठी नाही- रॉय
लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाच्या तीन महत्त्वाच्या पदांचा दिलेला राजीनामा ही दु:खद बाब आहे. मात्र कोणतीही व्यक्ती पक्षापेक्षा मोठी असू शकत नाही, असे मत पश्चिम बंगालचे ज्येष्ठ भाजप नेते तथागत रॉय यांनी व्यक्त केले. अडवाणींचा राजीनामा हा पक्षाला मोठा धक्का देईल, असे मला वाटत नाही. कारण पक्ष हा व्यक्तीपेक्षा मोठा असतो, असे रॉय म्हणाले.

Story img Loader