चिंग्ज, हॉर्लिक्स व नॉर नूडल्समध्ये राखेची मात्रा अधिक
देशाच्या खाद्यविश्वात मॅगी प्रकरणावरून उठलेले वादळ शमत असतानाच उत्तर प्रदेशच्या अन्नसुरक्षा विभागाला आणखी तीन कंपन्यांची नूडल्स उत्पादने हलक्या दर्जाची असल्याचे आढळले आहे. ‘चिंग्ज नूडल्स’, ‘हॉर्लिक्स फूडल्स’ व ‘नॉर सुपी नूडल्स’मधील राखजन्य पदार्थ प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीत निष्पन्न झाले आहे.
बाराबंकी जिल्ह्य़ाचे अन्न सुरक्षा अधिकारी संजय सिंग यांनी या संदर्भात माहिती दिली. मागील वर्षी मे महिन्यात येथील एका मॉलमधून नॉर सुपी नूडल्स, हॉर्लिक्स फूडल्स नूडल्स आणि चिंग्ज हॉट गार्लिक इन्स्टंट नूडल्सचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. ते लखनऊच्या शासकीय अन्न पृथक्करण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून या नूडल्समध्ये राखजन्य पदार्थाचे प्रमाण अवाजवी असल्याचे समोर आल्याने ही उत्पादने हलक्या दर्जाची असल्याचे सिद्ध झाले आहे. नूडल्समधील राखजन्य पदार्थाची मर्यादा १ टक्क्य़ापर्यंत निश्चित करण्यात आली आहे. परंतु, चिंग्ज नूडल्समध्ये १.८३ टक्के, सुपी नूडल्समध्ये १.८९ टक्के, तर फूडल्समध्ये तब्बल २.३७ टक्के इतक्या मात्रेत राखजन्य पदार्थ आढळले आहेत.
या तिन्ही कंपन्यांना आठवडय़ाभरापूर्वी नोटीस पाठविण्यात आली असून त्यांना अपिलासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. राखजन्य पदार्थ प्रमाणापेक्षा अधिक आढळल्याने त्यांचे आरोग्यावर काय विपरीत परिणाम होतात, हे मात्र या अहवालात नमूद नसल्याचे सिंग यांनी सांगितले. मागील मे महिन्यात उत्तर प्रदेशच्याच अन्न सुरक्षा विभागाला मॅगीमध्ये प्रमाणबाह्य़ शिसे व मोनोसोडियम ग्लुटामेट आढळले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा