मागील दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर मणिपूर हिंसाचाराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जमावाने दोन महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले. ही घटना ताजी असताना आता पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात दोन आदिवासी महिलांना कथितपणे नग्न करून मारहाण करण्यात आली आहे.
या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना १९ जुलै रोजी मालदा जिल्ह्यातील बामनगोला येथील आठवडी बाजारात घडली. मालदा जिल्ह्यातील माणिकचक परिसरातील पाच आदिवासी महिला आपली स्थानिक उत्पादनं विकण्यासाठी आठवडी बाजारात आल्या होत्या. यावेळी त्यांना इतर महिलांनी चोरी करताना पकडलं. यातील तीन महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्या पण दोन महिलांना इतर महिलांनी बाजारपेठेत पकडून मारहाण केल्याचा आरोप आहे.
या घटनेच्या व्हिडीओ फुटेजमध्ये महिलांचा एक गट दोन महिलांना चपलनं मारहाण करताना आणि त्यांचे कपडे फाडताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी संबंधित व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीकास्र सोडलं.
हेही वाचा- Manipur Horror: दोन महिलांना नग्न करत काढली धिंड, सामूहिक बलात्काराचा आरोप
अमित मालवीय एका ट्वीटमध्ये म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये दहशत कायम आहे. मालदा येथील बामनगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठवडी बाजारात दोन आदिवासी महिलांना विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. तरीही पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. १९ जुलै रोजी सकाळी ही घटना घडली. पीडित महिला सामाजिकदृष्ट्या उपेक्षित समुदायातील होत्या. या घटनेवर ममता बॅनर्जी केवळ आक्रोश करण्याऐवजी कृती करू शकल्या असत्या, कारण त्या बंगालच्या गृहमंत्रीदेखील आहेत.”
“ममता बॅनर्जींनी या घटनेवर काहीही निर्णय घेतला नाही. त्यांनी या घृणास्पद घटनेचा निषेधही केला नाही किंवा त्यांनी संवेदनाही व्यक्त केल्या नाहीत. कारण या घटनेमुळे ममता बॅनर्जी यांचं मुख्यमंत्री म्हणून अपयश उघड झालं असतं,” असंही मालवीय पुढे म्हणाले.
यानंतर संबंधित घटनेचं राजकारण केल्याप्रकरणी टीएमसीच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यमंत्री शशी पांजा यांनी भाजपावर टीका केली. पोलिसांनी या घटनेची स्वतःहून दखल घेतली आहे आणि गुन्हा दाखल केला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
शशी पांजा पुढे म्हणाल्या, “संबंधित पीडित आदिवासी महिला स्थानिक बाजारात गेल्या होत्या. यावेळी चोरी करताना त्यांना इतर काही महिलांनी रंगेहाथ पकडलं. त्यानंतर जनक्षोभातून महिलांना बेदम मारहाण करण्यात आली. असं घडायला नको होतं. पण कधी कधी अशा घटना घडतात, तेव्हा लोक अशा गोष्टींचा अवलंब करतात. ही घटना घडताना एका महिला पोलीस मित्राने पीडित महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने त्यांनाही धक्काबुक्की केली.”
हेही वाचा- “आधी भावाची हत्या केली मग बहिणीला नग्न करत धिंड काढली”, मणिपूरमध्ये त्यादिवशी नेमकं काय घडलं?
भाजपाने लोकांची दिशाभूल केल्याच्या आरोप करत टीएमसी नेत्या पुढे म्हणाल्या, “भाजपाला लाज नाही. कालही त्यांनी (भाजपा) हावडा येथील एका घटनेबाबत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. आज पुन्हा ते खोटी माहिती पसरवत आहेत. मालदा येथील घटनेला कोणताही राजकीय अर्थ नाही.ही स्थानिक घटना आहे. मणिपूरच्या घटनेवरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा बंगालमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं राजकारण करू पाहत आहे.”